महाजनादेश यात्रेच्या समारोपाला नरेंद्र मोदींची उपस्थितीत राहणार

महाजनादेश यात्रेच्या समारोपाला नरेंद्र मोदींची उपस्थितीत राहणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेचे दोन टप्पे झाले असून शुक्रवार १३ सप्टेंबर ते गुरूवार १९ सप्टेंबर या कालावधीत महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून तिसरा टप्पा प्रारंभ होऊन नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस व महाजनादेश यात्राप्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली. तसेच आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेस पहिल्या आणि दुस-या टप्प्यात सर्वत्र उस्फूर्त व अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

कामाचा लेखाजोखा जनतेसमोर जाऊन मांडणारे राज्यातले पहिले मुख्यमंत्री

विशेषतः युवक, महिला, मुस्लिम महिला आणि ग्रामीण भागात शेतकरी यांचा सहभाग आणि उपस्थिती लक्षणीय होती. आधीच्या दोन टप्प्यात महाजनादेश यात्रेचा राज्यातील २४ जिल्ह्यातील १०६ विधानसभा मतदारसंघातून २२०८ कि.मी. प्रवास झाला. आपल्या सरकारच्या पाच वर्षाच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर जाऊन मांडणारे मा. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पहिले मुख्यमंत्री आहेत.

महाजनादेश यात्रेचा प्रारंभ अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झाला होता. दुस-या टप्प्यात जालना येथे भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव उपस्थित होते. महाजनादेश यात्रेच्या दुस-या टप्प्याचा समारोप सोलापूर येथे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस व निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत झाला.

१३ जिल्ह्यातील ६० विधानसभा मतदारसंघातून १,५२८ कि.मी. प्रवास

महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा शुक्रवार १३ सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून प्रारंभ होईल. तिसऱ्या टप्प्यात ही यात्रा १३ जिल्ह्यातील ६० विधानसभा मतदारसंघातून १,५२८ कि.मी. प्रवास करणार आहे. गुरूवार १९ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष उपस्थितीत नाशिक येथे महासभेने महाजनादेश यात्रेचा समारोप होणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस व महाजनादेश यात्रा प्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.

First Published on: September 11, 2019 5:44 PM
Exit mobile version