सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात परंतु केंद्राची मेहेरनजर गुजरातवर, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात परंतु केंद्राची मेहेरनजर गुजरातवर, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

राज्यात कोरोना संसर्गाचा विस्फोट झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात हाहाकार घातला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. सर्वच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालये भरली आहेत. तसेच बेड्स, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेडची कमतरता भासत आहे. यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद निर्माण झाला आहे. केंद्र सरकार राज्याला आरोग्य यंत्रणेची मदत करण्यात दुजाभाव करत असल्याचा आरोप राज्य सरकारमधील नेत्यांनी केला आहे. भाजपशासित प्रदेशात केंद्र सरकार वैद्यकीय उपकरणांचा मोठा पुरवठा करत आहे परंतु महाराष्ट्राला पुरवठा करण्यात दुजाभाव केला जात असल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राला फक्त लसी देण्यातच नाही तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे. लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यात रुग्णसंख्येच्या व्यस्त पटीने N95 मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटीलेटर्स केंद्र सरकारने दिले आहेत. असे ट्विट काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. तसेच केंद्र सरकारने आतापर्यंत राज्यांना केलेल्या वैद्यकीय उपकरणांची माहिती दिली आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, लोकसभेच्या उत्तरानुसार, सर्व विभागांत गुजरातला वैद्यकीय उपकरणांच्या पुरवठ्यात मोठा वाटा देण्यात आला जो केसेसच्या संख्येवर अवलंबून आहे. राजकारणाच्या आधारे भेदभाव केला नाही तर काय?, नरेंद्र मोदी हे गुजरात, उत्तर प्रदेश आणि काही भाजपा शासित राज्येच नव्हे तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत हे विसरत आहेत.

राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. परंतु केंद्र सरकार राज्याला सावत्र आईसारखी वागणूक देत आहे. ही वागणूक लसीच्या पुरवठ्याबाबतच नाही तर वैद्यकीय उपकरणे पुरवण्याबाबतही राज्यासोबत दुजाभाव करत आहे. केंद्र सरकारने लोकसभेत राज्यांना वैद्यकीय उपकरणांची मदत केली याचा तपशील सादर केला आहे. याच तपशीलाच्या आधारे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारने गुजरातसाठी प्रत्येकी १००० रुग्णांमागे १३ व्हेंटिलेटर दिले आहेत. तर उत्तर प्रदेशला ७ देण्यात आले परंतु महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या जास्त असताना फक्त २ व्हेंटिलेटर दिले आहेत. तसेच वैद्यकीय उपकरणे देण्यातही केंद्राने दुजाभाव केला असल्याचा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

First Published on: April 11, 2021 2:27 PM
Exit mobile version