अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने ‘166 – अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी म्हणजे दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Public holiday in Andheri East Assembly Constituency on 3 November)

ही सार्वजनिक सुट्टी ‘166 – अंधेरी पूर्व’ या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी अंधेरी मतदार संघांच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असल्याचे आदेशित करण्यात आले आहे. तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.

या पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून अंधेरी पूर्व भागातील जागरूक नागरिकांनी या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांचा दुबईत हदयविकारच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. एखाद्या आमदाराचा मृत्यू झाल्यास सहा महिन्यांच्या आत संबंधित मतदारसंघात पोटनिवडणूक घेणे गरजेचे असते. त्यानुसार निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके आणि भाजपाकडून मुरजी पटेल यांच्यात लढत होणार आहे.


हेही वाचा – ‘पक्षाला जर गरज वाटली तर मी निवडणूकही…’; अमित ठाकरेंच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

First Published on: October 15, 2022 2:48 PM
Exit mobile version