हेमंत रासनेसह काँग्रेसचे रविंद्र धंगेकर आणि राष्ट्रवादीच्या रुपाली पाटीलवर गुन्हा दाखल, काय हे प्रकरण?

हेमंत रासनेसह काँग्रेसचे रविंद्र धंगेकर आणि राष्ट्रवादीच्या रुपाली पाटीलवर गुन्हा दाखल, काय हे प्रकरण?

या पोटनिवडणूकीचं मतदान पार पडलं असलं तरी या मतदारसंघात ट्विस्ट काही संपण्याचं नाव घेत नाही,

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोट निवडणुकांसाठी नुकतच मतदान पार पडलं. या पोटनिवडणूकीचं मतदान पार पडलं असलं तरी या मतदारसंघात ट्विस्ट काही संपण्याचं नाव घेत नाही, या मतदारसंघातील उमेदवारांमध्ये आता कारवाईसाठी झुंज पहायला मिळतेय.

कसबा पोटनिवडणुकीतील काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकरांनी उपोषण केलं होतं, भाजपने निवडणुकीदरम्यान पैसे वाटल्याचा आरोप करत त्यांनी हे उपोषण केलं होतं. त्यांचं हे उपोषण आचारसंहितेचा भंग करत करण्यात आल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या रूपाली ठोंबरे पाटील यांच्यावरही गोपनियतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यांनी कसबा पोटनिवडणुकीच्या दिवशी सकाळी ७ च्या सुमारास रूपाली पाटील यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये ईव्हीएमचा फोटो शेअर केल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. एका मतदाराने रविंद्र धंगेकर यांना वोट केल्याचं या फोटोमध्ये दिसतंय. त्यावरून रूपाली पाटील यांच्यावर कारवाईची मागणी सुरू झाली आणि त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर मात्र रूपाली ठोंबरे पाटील यांनी भाजपला टार्गेट केलं. रुपाली ठोंबरे पाटील यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा नूमवी मतदान केंद्रातील एक फोटो शेअर करत त्यांच्यावरही कारवाईची मागणी केली. कसबा पोटनिवडणूक मतदान केंद्रावर हेमंत रासने हे गळ्यात पक्षाचा मफलर घालून मतदान करताना दिसून आले, मग हा गुन्हा नाही का? असा सवाल उपस्थित करत त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. “आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या लोकांनी आधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तसदी घ्यावी. सत्ताधाऱ्यांनी कायद्याने राज्य चालवावे, असा सल्ला देखील त्यांनी दिला होता. रासने यांना हा प्रकार चांगलाच भोवला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यात अटीतटीची झुंज पहायला मिळतेय. कसबा हा आतापर्यंतचा भाजपचा बालेकिल्ला डगमळीत झाल्याचे चित्र निर्माण झाले असताना, मतदान कुणाच्या पारड्यात पडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर चिंचवडमध्ये तिरंगी लढतीत बंडखोर उमेदवाराची बंडखोरी ही ‘नुरा कुस्ती’ ठरणार की, ‘जायंट किलर’यावर निकालाचे भवितव्य असणार आहे.

First Published on: February 27, 2023 12:50 PM
Exit mobile version