PM केअर फंडातील पुण्याला मिळालेले ५८ व्हेंटिलेटर निघाले खराब, पालकमंत्र्यांकडे अधिकाऱ्याची तक्रार

PM केअर फंडातील पुण्याला मिळालेले ५८ व्हेंटिलेटर निघाले खराब, पालकमंत्र्यांकडे अधिकाऱ्याची तक्रार

ऑक्सिजन, व्हेंटिलेटरअभावी जीव जात असताना अकोल्यात ४० व्हेंटिलेटर पडून

राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईसह पुण्यात कोरोना उद्रेक झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करा अशी मागणी केंद्राकडे करण्यात येत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात कोरोना लसीवरुन वादंग तयार झाले असताना पीएम केअर फंडातून पुण्याला मिळालेले ५८ व्हेंटिलेटर खराब निघाले असल्याची माहिती समोर येत आहे. पुण्याला मिळालेले ५८ व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप ससून हॉस्पिटलचे डिन डॉ. मुरलीधर तांबे यांनी केली आहे. याबाबत तक्रार पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आढावा बैठकीदरम्यान केली आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात नोंद होत आहे. सर्व शासकिय आणि खासगी रुग्णालये संपूर्ण क्षमतेने भरली आहेत. तसेच एकही व्हेंटिलेटर बेड व आयसीयू बेड रिक्त नाही. यामध्येच पुणे जिल्ह्याला पीएम केअर फंडातून देण्यात आलेले ५८ व्हेंटिलेटर खराब निघाले आहेत. व्हेंटिलेटर ठीक चालत नसून अनेकवेळा बंद पडत असतात. तसेच कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये पुण्याला मिळालेले व्हेंटिलेटरही निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप ससून रुग्णालयाचे डिन डॉ. तांबे यांनी केला आहे.

राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये कोरोना लसींच्या पुरवठ्यावरुन वादंग सुरु असताना आता व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचा निघाले असल्यामुळे या वादात ठिणगी पडण्याची शक्यता आहे. दरम्यान पुण्याची कोरोना परिस्थिती चिंताजनक आहे. पुण्यात कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे काही लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. राज्याला कोरोना काळात केंद्राकडून योग्य मदत होत नसल्याचा आरोपही राज्यातील काही नेत्यांनी केला आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत राज्याला १,१२१ व्हेंटिलेटर्सचा पुरवठा केला जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या आढावा बैठकीदरम्यान जावडेकर यांनी राज्याला व्हेंटिलेटर पुरवले जातील असे सांगितले आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी नियमावली

कोरोनाबाधित रुग्णांना लवकर बरे करण्यासाठी राज्यात रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. परंतु राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा असल्यामुळे नफेखोर या औषधाचा काळाबाजार करत आहेत. काळाबाजार रोखण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या खरेदी-विक्रीसाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी नियमावली जारी केली आहे. यामध्ये कोविड रुग्णालयाच्या मेडिकल दुकानात या इंजेक्शनची खरेदी- विक्री केली जाईल. तसेच ज्या रुग्णालयात मेडिकल नाही अशा रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन मिळेल असे म्हटले आहे. रेमडेसिवीरची मागणी करताना सर्व माहिती पुणे विभागाच्या डॅशबोर्डवर भरणे अनिवार्य राहणार आहे.

First Published on: April 11, 2021 3:49 PM
Exit mobile version