अतिवृष्टीमुळे खरिपाच्या पिकांचे नुकसान, पंचनामे मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार

अतिवृष्टीमुळे खरिपाच्या पिकांचे नुकसान, पंचनामे मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार

अतिवृष्टीमुळे खरिपाच्या पिकांचे नुकसान

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या खरिपाच्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून जिल्ह्यातील कोरडवाहू, बागायती आणि फळपिकांचे एकूण १ लाख १५ हजार ७४६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. तर सुमारे १ लाख २० हजार शेतकरी बाधित झाले आहेत. जुन्नर तालुक्यात सत्तावीस हजार हेक्टर क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान झाले असून जिल्हाप्रशासनाने याबाबतचा अहवाल तयार करून रविवारी राज्य शासनाकडे पाठविला आहे. मान्सूनचे उशिरा आगमन आणि त्यानंतर परतिच्या मान्सूनचा मुक्काम वाढल्याने राज्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली. पुणे जिल्ह्यातही अतिवृष्टी होत खरिपाच्या पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकर्‍याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे शासनाने तात्काळ दखल घेत १५ नोव्हेंबरपर्यंत खरिपाच्या पिकांच्या नुकसांचे पंचनामे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांना देण्याचे सांगितले आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यात तहसिल, तलाठी आणि गट विकास अधिकार्‍यांनी ऑनलाईन पद्धतीने पंचनामे पूर्ण केले आहेत.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तब्बल १ लाख १५ हजार ७४६ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने पचंनाम्यात निष्पन्न झाले आहे. यामध्ये भात, सोयाबिन, ऊस, भुईमूग, कापूस, ज्वारी या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. नुकसानीत सुमारे १ लाख २० हजार शेतकरी बाधित झाले आहेत. सर्वाधिक नुकसानीला जुन्नर तालुक्यातील शेतकर्‍यांना सामोरे जावे लागले असून भोर तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ५५० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. – डॉ. जयश्री कटारे, उप जिल्हाधिकारी 

नुकसान भरपाई देण्यात येणार

शासनाच्या नियमानुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त (१ हेक्टर पर्यंत) नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यामध्ये उभी पिके, काढून ठेवलेले पिके आणि नुकतीच पेरणी केलेले पिकांचे क्षेत्र या सर्व बाबी लक्षात घेऊन पंचनामा करत शेतकर्‍यांना मतदनिधी देण्यात येणार आहे. विशेषतः ज्या शेतकर्‍यांनी पिक कर्ज घेतले आहे, त्या शेतकर्‍यांचे पिक कर्ज माफ होणार आहे. दरम्यान, शेतकर्‍यांनी पिकांचा विमा काढला आहे, त्यासंबंधी विमा कंपन्यांनी संपर्क साधून त्यांचा अहवाल मागविण्यात येत आहे. तसेच शासनाने क्षेत्रनिहाय पिकांनुसार प्रति हेक्टरीच्या तीन पट मदत जाहीर केली असून कोरवाहू पिकांसाठी ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टरी, बागायती तेरा हजार ५०० आणि फळपिकांसाठी १८ हजार यानुसार दर निश्चित करून त्याच्या तीनपट मतद शेतकर्‍यांना देण्यात येणार असल्याचेही डॉ. कटारे यांनी सांगितले.

तालुका क्षेत्र             (हेक्टरमध्ये)

जुन्नर                     २७ हजार
बारामती                  १७ हजार
आंबेगाव                  १५ हजार ८००
पुरंदर                     ११ हजार
इंदापूर                    ७ हजार ५००
मावळ                    ५ हजार ५००
हवेली                     ४ हजार ५००
शिरूर                    ४ हजार
मुळशी                   १ हजार ५००
वेल्हे                     ८००
भोर                      ५५०


हेही वाचा – ‘स्मार्टमीटर’ योजना पुन्हा वादाच्या भोवऱ्यात


 

First Published on: November 11, 2019 10:22 PM
Exit mobile version