मोबाईल होता म्हणून वाचला जीव! भीमाशंकर अभयारण्यात अडकलेल्या 6 जणांची सुटका

मोबाईल होता म्हणून वाचला जीव! भीमाशंकर अभयारण्यात अडकलेल्या 6 जणांची सुटका

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे वर्षा सह आणि ट्रेकिंगसाठी डोंगरदऱ्यांमध्ये भटकंतीसाठी जाणाऱ्यांचा ओघ वाढतोय. यात आंबेगावातील भीमाशंकर अभयारण्यातही पर्यटक येत आहेत. मात्र या पर्यटकांकडून सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असताना दिसतेय. मुंबईवरून भीमाशंकर अभयारण्यातील डोंगर दऱ्यांमध्ये फिरण्यासाठी आलेले सहा युवक रविवारी हरवल्याची घटना समोर आली. मात्र मोबाईलमुळे या सर्व तरुणांची सुखरुप सुटका करण्यात आली, प्रशासनाच्या रेस्क्यू टीम आणि काही ट्रॅकर्स ग्रुपच्या मदतीने त्यांना शोधण्यात यश आले. त्या सर्वांचा मोबाईल सुरु असल्याने त्यांचे लोकेशन ट्रॅक करून माग काढण्यात आला. मोबाईल नसता तर या पर्यटकांचा शोध घेणे कठीण झाले असते.

पवन अरुणप्रताप सिंग (वय २६), सर्वेश श्रीनिवास जाधव (वय २६), निरज रामराज जाधव (वय २८), दिनेश धर्मराज यादव (वय २३), हितेश श्रीनिवासी यादव (वय २५), अंकुश सत्यप्रकाश तिवारी (वय २३ सर्वजण रा. उल्हासनगर) अशी या पर्यटकांची नावं आहे. हे सहा जण ट्रेकिंगसाठी भीमाशंकरच्या जंगलात आले होते. मात्र दाट धुके आणि घनदाट जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग ते विसरले. याशिवाय जंगलात तुफान पावसाने हजेरी लावली होती. यामुळे सर्व पर्यटक एका खोल दरीत अडकून पडले. यावेळी फोनवरून त्यांनी घोडेगाव पोलिसांशी संपर्क केला. तात्काळ स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने व त्यांचे कर्मचारी तसेच काही स्थानिक युवकांच्या मदतीने रेस्क्यू आॅपरेशन सुरु केले, यावेळी रेस्क्यू टीमने सहा जणांना रात्रीच्या वेळी भर पाऊस व धुक्यामधून सुखरूप बाहेर काढले.

मुंबईसह राज्यातील अनेक हैसी पर्यटक आणि ट्रेकर्स बैल घाट, शिडी घाटमार्गे भीमाशंकर अभयारण्यात येत असतात. गुगल मॅपवर अवघ्या 5 किलोमीटरचा हा रस्ता दिसतो. मात्र प्रत्यक्षात घनदाट झाडी, डोंगर दऱ्या असल्यामुळे उंचावरील भीमाशंकराला पोहचण्यात वेळ लागतो. अशा परिस्थितीत जे पर्यटक उशीराने भीमाशंकरवर चढण्यास सुरुवात करतात त्यांना संध्याकाळी खाली परतताना पाऊस आणि धुक्यामुळे रस्ता स्पष्ट दिसत नाही. यामुळे रस्ता भरकटून जंगलात पर्यटक अडकलेल्या अनेक घटना घडतात.

यावेळी संबंधित सहा युवकांनीही कोकणामधून भीमाशंकरवर चढण्यास सुरुवात केली होती. यावेळी रस्त्यात मोठ्याप्रमाणात मुसळधार पाऊस आणि धुके होते. सायंकाळी 5 वाजता सर्वत्र अंधार दिसू लागल्याने रस्ता दिसेनासा झाला. या परिस्थितीत सहा जण घाबरले आणि त्यांनी तात्काळ कुटुंबियांशी संपर्क साधला. तसेच कुटुंबियांनाही पोलिसांशी संपर्क साधून मदतीचे आवाहन केले. युवकांनी मोबाईलवरून आपले गुगर लाईव्ह लोकेशन पाठवले. या लोकेशनच्या मदतीने पोलीस आणि स्थानिक तरुण अडकलेल्या दरीचा शोध घेत दोरखंड आणि इतर साहित्यांच्या आधारे त्यांची सुखरूप सुटका केली.

मुसळधार पाऊस आणि दाड धुक्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडचणी येत होत्या. अंधारी रात्र आणि दाट धुक्यामुळे बॅटरीच्या मदतीने समोरचे दिसेनेही कठीण झाले होते. यात जंगलातील भयानक विषारी सर्प आणि अत्यंत अरुंद रस्ते असल्यामुळे अंगावरती शहारे आल्याचा अनुभव पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण यांनी सांगितला. दरम्यान रात्री उशीरा रेस्क्यू टीमच्या मदतीने युवकांना वर काढण्यात आले, यावेळी तरुण अतिशय भेदरलेल्या अवस्थेत कापत होते.


नवा अशोक स्तंभ आक्रमक आणि रागीट, राष्ट्रीय चिन्हाचा अपमान झालाय; तृणमूलच्या खासदाराची मोदींवर टीका

 

First Published on: July 12, 2022 4:35 PM
Exit mobile version