मंत्रीपद मिळूनही भाजपा प्रदेशाध्यक्षपद नसल्याची चंद्रकांत पाटलांना खंत

मंत्रीपद मिळूनही भाजपा प्रदेशाध्यक्षपद नसल्याची चंद्रकांत पाटलांना खंत

पुणे – एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मंत्री चंद्रकांत पाटील यांना भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्रिपद यापैकी कशाला प्राधान्य द्याल, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पक्ष नेतृत्वासाठी प्रदेशाध्यक्षपद असे उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिले. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवल्याचे शल्य पाटील यांच्या मनात आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कॅबिनेटमध्ये स्थान देण्यात आले आहे. फडणवीस सरकारच्या काळात चंद्रकांत पाटील यांच्यावर महसूल मंत्रालयाची जबाबदारी होती. दरम्यान चंद्रकांत पाटील यांना शिंदे-फडणवीसांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्रिपद सोपवले आहे. यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले. त्यामुळे त्यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्रिपद यापैकी कशाला प्राधान्य द्याल या प्रश्नाला उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष पदाला पसंती दिली. यामुळे पुन्हा त्यांची खंत उघड झाल्याचे बोलले जात आहे.

यावेळी त्यांना तांबडा-पांढरा रस्सा की बाकरवडी, असा सूचक प्रश्‍न विचारण्यात आला. यावर चंद्रकांत पाटील यांनी दोन्हीला पसंती देत पुणे-कोल्हापूरवर समान प्रेम असल्याचे सांगीतले २०२४ मध्ये भाजप शत प्रतिशत का शिंदे सरकार? या प्रश्नावर, येणारा काळ ठरवेल, असे उत्तर त्यांनी दिले. शिंदे सेना की उद्धव सेना? या प्रश्नालाही, भविष्यात काय होईल याचा अंदाज घेता शिंदे सेना, हे उत्तर पाटलांनी दिले.

First Published on: September 17, 2022 9:25 AM
Exit mobile version