पुण्यात शिवसेनेला धक्का, नाना भानगिरे शिंदे गटात सामील

पुण्यात शिवसेनेला धक्का, नाना भानगिरे शिंदे गटात सामील

शिवसेनेला पुण्यात एक मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्यानंतर शिवसेनेला खिंडार पडले आहे. पुण्यातील नगरसेवक नाना भानगिरे हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे गटाकडून नाना भानगिरे यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिली जाणार आहे. नाना भागिरे हे आतापर्यंत पुणे महानगरपालिकेत तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी तीन वेळा हडपसर मतदारसंघातून विधानसभेची निवडणुक लढवली होती.

पुण्यातील शिवसेनेचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला होता. यानंतर पुण्यातील माजी नगरसेवक नाना भानगिरे हे शिंदे गटात सामील झाले आहेत. हडपसर भागात भानगिरे यांचे मोठे प्रस्थ आहे.

हडपसर भागात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असणाऱ्या नाना भानगिरे यांच्यासोबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा एक मोठा गट देखील शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. भानगिरे यांना विधानपरिषद आमदारपदाची संधी किंवा एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची देखील शक्यता आहे. याचीच फिल्डिंग लावण्यासाठी पुण्यातील शिवसेनेचे काही माजी नगरसेवक मुंबईत पोहचले असून आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गटाला चर्चेचे निमंत्रण दिल्याची माहिती आहे.दरम्यान, येत्या काही दिवसांत पुणे महापालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. अशात आधीच पुण्यात शिवसेनेची ताकद जेमतेम असल्याने भानगिरे यांच्या रूपाने शिंदे गट पुणे शिवसेनेला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पुण्यात शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

First Published on: July 5, 2022 12:45 PM
Exit mobile version