पुण्याचा पालकमंत्री राष्ट्रवादीचाच – अजित पवार

पुण्याचा पालकमंत्री राष्ट्रवादीचाच – अजित पवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचे खातेवाटप निश्चित झाल्यानंतरही राष्ट्रवादी कॉंग्रेसला आणखी एक खाते मिळणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिले आहेत. ज्या जिल्ह्यात ज्याचे आमदार जास्त त्या जिल्ह्यात त्या पक्षाचा पालकमंत्री असेल. तसेच पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच असल्याची माहिती त्यांनी दिली.

राष्ट्रवादीला आणखी एका मंत्रिपदाची अपेक्षा

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यानंतर राष्ट्रवादीचा पहिलाच कार्यकर्ता मेळावा आज पुण्यात झाला. पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांचा अजित पवारांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. अजित पवार या कार्यक्रमाला येणार असल्याने ते काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मंत्रिमंडळाविषयी बोलताना अजित पवार म्हणाले की, “तीन आमदारांच्या मागे एक मंत्री अशी मंत्रिमंडळाची रचना आहे. पुणे जिल्ह्यात दहा आमदार असल्यानं मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे आणखी एका मंत्रिपदाची मागणी केली आहे. ते मिळेल, अशी मला अपेक्षा आहे.”

कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा आदेश

विधीमंडळाच्या अधिवेशनानंतरच खातेवाटप आणि मंत्रिमंडळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदासह सर्वाधिक १६ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादीत अजूनही ट्विस्ट कायम आहे. शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपदासह १५ मंत्रिपदं येतील. तर कॉंग्रेसला १२ मंत्रिपदं मिळतील, अशी माहिती मिळाली आहे. अजित पवार आल्यानंतर कार्यकर्त्यांनी दादा तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा, अशी गळ घातली. त्यावेळी अजित पवारांनी संयमाने त्यांना शांत राहण्याचे सांगत तुमच्या भावना समजल्या असे म्हणाले.

आयारामांना रेड कार्पेट नको

अजित पवार म्हणाले की, “आयारामांना लगेच रेड कार्पेट नकोच. उगवत्या सुर्याला नमस्कार करणारे भरपूर जण पक्षात येण्याचा प्रयत्न करतील. पण सगळ्यांनाच तपासून घेणार आहोत. काही लोकं तिकडे गेल्यानं पक्षाचं ओझं कमी झालं आहे. साहेबांच्या सातारच्या सभेने हवा झाली. ईडीने वातावरण बदललं. फडणवीसांना मी पणाचा फटका बसला. तीनही पक्षांनी वाद टाळले तर पाच वर्षे सरकार चालेल असेही त्यांनी सांगितले.”

First Published on: December 14, 2019 9:34 PM
Exit mobile version