मनोहर पर्रीकरांचा अवमान; अंत्यदर्शनासाठी ठेवलेल्या वास्तूचे केले शुद्धीकरण?

मनोहर पर्रीकरांचा अवमान; अंत्यदर्शनासाठी ठेवलेल्या वास्तूचे केले शुद्धीकरण?

कला अकादमी येथे मनोहर पर्रिकरांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी होम हवन

देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव गोव्यातील कला अकादमी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मात्र आता या कला अकादमीचे शुद्धीकरण केले असल्याचा आरोप मनस्विनी प्रभुणे यांनी केला आहे. फेसबुकवर पोस्ट टाकून त्यांनी हा आरोप केला आहे. या पोस्टखाली अनेक नेटीझन्सनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. तसेच आता गोव्याचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

मनस्विनी प्रभुणे यांनी काल ही फेसबुक पोस्ट टाकली होती. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “कला अकादमीमध्ये एका कार्यक्रमाला गेले असता होमकुंड पेटलेला दिसला. पुढे भटजीबुवांचा आवाजही ऐकू आला. या वेळी कला अकादमीमध्ये कसली पुजा? जरा आश्चर्य वाटलं. राजूने चौकशी केली तर अकादमीच्या कर्मचार्‍यांच्या वतीने अकादमीच्या वास्तूंचे शुध्दीकरण-शांत करणं सुरू होतं.” तसेच सरकारच जर सरकारी वास्तूंमध्ये शुद्धीकरणासारखे कार्यक्रम घेत असेल तर मग मिरामार बीचचेही शुद्धीकरण करणार का? असा सवालही प्रभुणे यांनी उपस्थितीत केला आहे.

मनोहर पर्रिकर यांचे १७ मार्च रोजी कॅन्सरमुळे निधन झाले होते. त्यानंतर १८ मार्च रोजी पणजीतील कला अकादमी येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. आता या वास्तूत होम हवन आणि गोमूत्र शिंपडून ही वास्तू पवित्र केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारानंतर अकादमीचे अध्यक्ष आणि गोव्याचे कला व सांस्कृतीक खात्याचे मंत्री गोविंद गावडे म्हणाले की, कला अकादमीत होम हवन करण्यासाठी परवानगी मागितील गेली होती, मात्र त्याचा उद्देश नेमका काय होता? याची कल्पना नाही. या प्रकरणाची चौकशी करुन निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले आहेत.

First Published on: March 24, 2019 11:46 AM
Exit mobile version