“राऊतांच्या टीकेला काडीमात्र किंमत देत नाही..”, राहुल नार्वेकरांचा टोला

“राऊतांच्या टीकेला काडीमात्र किंमत देत नाही..”, राहुल नार्वेकरांचा टोला

16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना घ्यायचा आहे. याबद्दलचे निर्देश सुप्रीम कोर्टाकडून राहुल नार्वेकर यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे याबाबतचे निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावेत, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे. तसेच हे निर्णय राहुल नार्वेकर यांनी कायद्याच्या चौकटीत राहून आणि सुप्रीम कोर्टाने आखून दिलेल्या नियमांनुसार घ्यावा, अशी मागणी देखील ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे. पण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे या प्रकरणावरून नेहमीच राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करत आहेत. नार्वेकर हे सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला तेव्हा लंडनच्या दौऱ्यावर होते. ते कालच (ता. 15 मे) मुंबईत दाखल झाले आहेत. त्यानंतर आज लगेच कामकाजाला सुरुवात करत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी 16 आमदारांच्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.

हेही वाचा – राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा इशारा, म्हणाले…

संजय राऊत यांच्याबाबत राहुल नार्वेकर यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, विधानसभेच्या बाहेर नियमबाह्य, घटनाबाह्य करण्यात आलेल्या वक्तव्यावर मी लक्ष देत नाही. अशा वक्तव्यांना काडीमात्र किंमत देत नाही. खरं तर असे अपेक्षित असते की एखादी व्यक्ती जेव्हा संविधानिक जबाबदारी पार पाडत असते. त्यावेळी त्यांच्याकडून संविधानाचा मान राखत जबाबदाररित्या संविधानिकरित्या भाष्य करणे अपेक्षित असते. ज्यावेळेला आपण भाष्य करत असतो आणि ते भाष्य आपण संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबाबत करत असतो, त्यावेळी जबाबदारीपूर्वक वक्तव्य करणं हे अपेक्षित असते. पण मला वाटतं अशी अपेक्षा काही लोकांकडून ठेवणं व्यर्थ आहे, त्यामुळे अशा लोकांना दुर्लक्षित करणं हे लोकशाहीसाठी महत्त्वाचे आहे. ”

काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ते म्हणाले की अनेक पक्षांतर केलेले अध्यक्ष आहेत ते. पक्ष वारंवार बदलणं हा त्यांचा आवडता छंद आहे. नार्वेकर हे आधी शिवसेनेचेच वकिल होते. त्यांनी जरा अध्यक्ष म्हणून बोलावं. नार्वेकर हे कायद्याचे उत्तम जाणकार आहेत. परंतु त्यांना जर दुर्योधनाच्या बाजूने उभं राहायचं असले तर त्यांनी कायद्याची पदवी पेटीत बंद करावी, असं राऊत म्हणाले.

First Published on: May 16, 2023 3:05 PM
Exit mobile version