Raigad Tourism : मुरूड, काशीदमध्ये पुन्हा पर्यटकांची पाऊले

Raigad Tourism : मुरूड, काशीदमध्ये पुन्हा पर्यटकांची पाऊले

रायगड जिल्ह्यातील मुरुडमध्ये पर्यटकांचा ओघ

नांदगाव : मरुड तालुक्यातील काशीद, मुरूड, नांदगांव समुद्रकिनारी पर्यटनस्थळांवर मार्चपासून शुकशुकाट होता. मात्र, शुक्रवार (१२ एप्रिल) संध्याकाळपासून पर्यटकांचे आगमन होऊ लागल्याने नांदगाव, काशीद बीच पर्यटकांनी फुलले आहेत. त्याचवेळी मुरूडमधील जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. शालेय परीक्षा, तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्याने पालक आता निश्चिंत झाले आहेत. त्यामुळे आता सहकुटुंब भटकंतीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मार्चमध्ये ओस पडलेले पर्यटन स्थळे आता हाऊसफुल्ल झाले आहेत.

पर्यटकांच्या वर्दळीने व्यावसायिकांना पुन्हा तेजीचे दिवस येणार आहे. काशीद समुद्रकिनारी सुमारे तीन-चारशे वाहने सकाळी दाखल झाल्याची माहिती रेस्टहाऊस मालक सूर्यकांत जंगम यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या सुट्ट्य़ा सुरू झाल्याने अनेक ठिकाणांहून पर्यटक जंजिरा, काशीद बीच, मुरूड बीच, नांदगाव येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक देवस्थान, फणसाड वन्यजीव अभयारण्य, मुरूड दत्तमंदिर देवस्थान, बारशिव येथील रॉक बीचवर दाखल होत आहेत.

हेही वाचा… Raigad liquor Crime : रायगडमधील हातभट्टीचालकांचे धाबे दणाणले

पर्यटकांची पाऊले शुक्रवार रात्रीपासून पडू लागली आहेत. मुरूड बीचवर प्रशस्त पार्किंग जवळजवळ पूर्णत्वास आले असून सध्या ते पार्किंगसाठी विनामूल्य उपलब्ध असल्याने पर्यटकांची काळजी मिटली आहे. त्यामुळे आता पर्यटकांची वर्दळ वाढत राहणार, अशी माहिती रेस्टहाऊस मालक सूर्यकांत जंगम, मनोहर बैले, महेंद्र पाटील आदींनी दिली.

हेही वाचा… Raigad Water Crisis : दे माय… पाणी दे, पाणी दे!

जलदुर्ग जंजिऱ्याचे आकर्षण

इथे येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते ते मुरूडमधील ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग. मुरुडजवळील खोरा जेट्टी आणि राजपुरी गावाजवळील प्रशस्त जेट्टीवरून पर्यटकांना जंजिरा किल्ल्यात नेण्याची सुविधा उपलब्ध आहे. जंजिरा अभेद्य राहिल्याने त्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.

समुद्रात २२ एकरवर जंजिरा किल्ला असून किल्ल्यात गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. त्यामुळे दरवर्षी सुमारे पाच लाख पर्यटक जंजिरा किल्ला आवर्जून पाहतात, अशी माहिती अलिबाग-मुरूड पुरातत्व विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली. राजपुरी जेट्टीवरुन शिडाच्या बोटींने कुटुंबासमवेत जंजिऱ्यात जाण्याचा आनंद आणि समाधान वेगळेच असल्याची प्रतिक्रिया पुण्यातील पर्यटक प्रसाद शेळके आणि शुभदा शेळके या दाम्पत्याने दिली.

First Published on: April 14, 2024 1:31 AM
Exit mobile version