अरे देवा! रेनकोट समजून चोरले पीपीई किट आणि…

अरे देवा! रेनकोट समजून चोरले पीपीई किट आणि…

जगभर पसरणाऱ्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी वैद्यकीय प्रशासनासह, पोलीस प्रशासन, पालिका प्रशासन दिवसरात्र मेहनत घेत आहेत. तसेच या विषाणूचा डॉक्टरांना संसर्ग होऊ नये, याकरता मास्क, फेस मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन आणि पीपीई किटच्या माध्यमातून सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे. मात्र, आता या पीपीई किटची देखील चोरी होत असल्याचे समोर आले आहे.

नेमके काय घडले?

एका पठ्याने रेनकोट समजून रुग्णालयातून पीपीई किटची चोरी केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. मात्र, हा पीपीई किट चोरणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. नशेमध्ये या व्यक्तीने पीपीई किट चोरल्याचे म्हटले आहे.

एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार; पीपीई किटची चोरी करणारी व्यक्ती भाजी विक्रेता असून ही व्यक्ती नशेत होती. नशेत असल्याने ही व्यक्ती एका नाल्यात पडली. नाल्यात पडल्यावर या व्यक्तीला दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले. मात्र, याच दरम्यान त्याने रेनकोट समजून पीपीई किटची चोरी केली. घरी आल्यावर त्यांनी परिसरातील सर्वांना १ हजार रुपयांना नवीन रेनकोट घेतल्याचे सांगितले. मात्र, त्याचवेळी काही जणांनी त्याला हा रेनकोट नसून पीपीई किट असल्याचे सांगितले.

दरम्यान, या घटनेची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी पीपीई किट ताब्यात घेतले. तसेच भाजी विक्रेत्याची चाचणी करण्यात आली, त्यात भाजी विक्रेत्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सर्वांनाच धक्का बसला. सध्या ज्या परिसरात भाजी विक्रेता फिरला त्याची माहिती अधिकारी घेत आहेत.


हेही वाचा – Mumbai rain : पावसाचा फटका, पेडर रोड येथे भूस्खलनासह ५० झाडे उन्मळून पडली


 

First Published on: August 6, 2020 2:56 PM
Exit mobile version