मुंबईत पावसाचा सुपर संडे

मुंबईत पावसाचा सुपर संडे

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने रविवारी पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग केली. सकाळपासून सुरु झालेल्या पावसाने मुंबईकरांना रविवारच्या सुट्टीचा आनंद देऊन गेला. रविवारी दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला असला तरी मुंबईकरांनी मरिन लाईन्स, वरळी सीफेस आणि जुहू चौपाटीवर पावसात ओलेचिंब भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी गर्दी केली होती. तर अनेकांनी रविवार आणि पावसाचा दुहेरी मुहूर्त साधत मुंबई बाहेर काढता पाय घेतला होता.

दरम्यान, मुंबईत दमदार आगमन केल्यानंतर दुष्काळाने त्रस्त झालेल्या मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात येत्या आठवड्यात जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने रविवारी वर्तविला आहे. तर राज्यात दाखल झालेला मान्सून येत्या तीन दिवसांत भारतात पुढे पूर्व राजस्थानजवळ पोहचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार रविवार संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत कुलाबा वेधशाळेत १५.८ मिमि तर सांताक्रूझ वेधशाळेत ९.२ पावसाची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईसह राज्यात काही दिवसांपूर्वी दाखल झालेल्या मान्सूननंतर मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून वरुणराजाचे जोरदार आगमन झाले होते. त्यानंतर हवामान खात्याने देखील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यानंतर सोमवार सकाळपासून पावसाला सुरुवात झाल्याचे पहायला मिळाले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरावर ईशान्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी येत्या दोन दिवसांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे लवकरच मान्सून पुढे मध्य भारतात आणि त्यानंतर राजस्थानमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

तर आगामी दोन दिवसांत मुंबईसह ठाणे आणि पालघरमधील काही ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये रेड अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्गातही मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा काही ठिकाणी अनुभव येण्याची शक्यता आहे. कोल्हापूर आणि सातार्‍यात रविवार, मंगळवार आणि बुधवार या तीनही दिवशी घाट परिसरामध्ये मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शनिवार रात्रीपासून मुंबईत ११ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या असून १११ ठिकाणी झाडे पडली आहेत. मात्र त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर १३ ठिकाणी घरांची पडझड झाली असून सोसायटीची संरक्षक भिंत कोसळल्याने ५ ते ६ गाड्यांचा चक्काचूर झाला आहे.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने जाहीर केल्यानुसार विदर्भात सोमवार आणि मंगळवारी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस २०० मिलीमीटरपेक्षा जास्त असण्याची शक्यता ही वर्तविण्यात आली आहे. तर गेल्या काही महिन्यांपासून दुष्काळाहून होरपळलेल्या मराठवाड्याला देखील लवकरच गूडन्यूज मिळण्याची शक्यता असून येत्या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेली आहे. तर कोकणामध्ये देखील गेल्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता असून तशाच प्रकारचा पाऊस ठाणे आणि पालघर परिसरात अनुभवायला मिळेल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, परभणी, हिंगोली, नांदेड येथे मंगळवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर लातूर, औरंगाबाद, पुणे, जळगाव येथे बुधवारी एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असे अंदाज वर्तविण्यात आलेली आहे.

येत्या आठवड्यात मान्सून राजस्थानात
मुंबईसह राज्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाल्यानंतर मान्सून पुढच्या प्रवासासाठी निघाला आहे. या प्रवासासाठी सध्या पोषक वातावरण निर्माण झाले असून बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्यामुळे मान्सून येत्या दोन दिवसांत राजस्थान दाखल होईल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर मान्सूनची रेषा सध्या उत्तरप्रदेश ते उत्तराखंड या टप्प्यात रेंगाळली असून २ ते ४ जुलैदरम्यान उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड व्यापून मान्सून हिमाचलमध्ये पोहोचू शकतो.

गेल्या दहा वर्षांतील पावसाची नोंद
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत कोसळणार्‍या पावसाने जून महिन्यातील सरासरी गाठली आहे. सुमारे जूनमध्ये मुंबईत ९७ टक्के पावसाची नोंद झाली असून गेल्या दहा वर्षातील जूनमधील सर्वाधिक पावसाची दुसर्‍यांदा नोंद झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.

First Published on: July 1, 2019 4:22 AM
Exit mobile version