‘छेडेंगे तो छोडेंगे नहीं’; राज ठाकरेंना इशारा देणाऱ्या अब्दुल मतीन शेखानीला जामीन

‘छेडेंगे तो छोडेंगे नहीं’; राज ठाकरेंना इशारा देणाऱ्या अब्दुल मतीन शेखानीला जामीन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणातील मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यानंतर पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया संघटनेने मनसेला इशारा दिला. ‘हमको छेडेंगे तो छोडेंगे नहीं’ असं म्हणत पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडियाच्या अब्दुल मतीन शेखानी यांनी राज ठाकरेंना इशारा दिला होता. त्यानंतर अब्दुल मतीन शेखानी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अखेर आता या मतीन शेखानी यांना अखेर ठाणे न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सोमवारी ठाणे न्यायलयात झालेल्या सुनावणीत शेखानी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर शेखानी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंब्र्यात एका सभेत बोलताना अब्दुल मतीन शेखानी यांनी जाहीरपणे मनसेला इशारा दिला होता. त्यावेळी विना परवानगी गर्दी जमवल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून मतीन शेखानी हे फरार होते.

काय म्हणाले होते अब्दुल मतीन शेखानी?

“काही लोकांना भोंग्यांची अडचण होतेय. आपल्या मस्जिद आणि मदरशांची अडचण होत आहे. मी त्यांना एक सांगू इच्छितो, आम्हाला शांतता हवी आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा एक नारा आहे की हर मजदूर हमारा है. सोबतच आमचा दुसराही नारा आहे की, ‘हमको छेडो नहीं, हमको छेडेंगे तो हम छोडेंगे नहीं’ येवढं लक्षात ठेवा की, एक मदरसा, एक मस्जिद, एकाही लाऊडस्पीकरवर तुम्ही हात लावण्याचा प्रयत्न केला तर सर्वात पुढे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया दिसेल”, असं अब्दुल मतीन शेखानी यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयने ‘हमको छेडेंगे तो हम छोडेंगे नहीं’ असा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे येत्या 5 जून रोजी राज ठाकरे हे आयोध्येला जाणार आहेत. त्यावेळीही त्यांना सुरक्षा पुरवणार असल्याची माहिती समोर येत आहे.


हेही वाचा – बेस्ट प्रवाशांसाठी ‘टॅप इन टॅप आऊट’ सुविधा; चिल्लरची कटकट होणार दूर

First Published on: April 18, 2022 9:26 PM
Exit mobile version