वीज बिल कमी करा नाहीतर जनभावनेचा उद्रेक होईल!

वीज बिल कमी करा नाहीतर जनभावनेचा उद्रेक होईल!

लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीज बिलांवरून मनसे आक्रमक झाल्याच्या पार्श्वभूमीवर अदानी समूहाच्या अधिकार्‍यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी भेट घेतली. ‘वाढीव वीज बिलातून सर्वसामान्यांना दिलासा द्या, अन्यथा जनभावनेचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा राज यांनी अदानी वीज कंपनीच्या अधिकार्‍यांना दिला आहे.

अदानी समूहाचे सीईओ शर्मा यांनी राज यांच्याशी चर्चा केली. कोरोनामुळे गेल्या काही महिन्यात लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. लोक अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहेत. रोजगाराचे साधन नाही, पगार कमी झाले आहेत. हे सगळे असताना विजेची बिले जास्त आली आहेत. लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. पुढील दिवसांत बिले कमी करून दिलासा दिला नाही तर लोकभावनेचा उद्रेक होऊ शकतो. त्यानंतर जी परिस्थिती निर्माण होईल, ती कोणाच्याच हातात राहणार नाही,’ असे राज ठाकरे यांनी अदानीच्या अधिकार्‍यांच्या निदर्शनास दिले.

मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी या भेटीची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. ‘वीज कंपन्यांनी त्यांच्या बाजूने सरकारकडे प्रस्ताव दिला आहे. मात्र, लोकांना हे कारण पटणारे नाही, असे आम्ही त्यांना सांगितले आहे. ‘वीज कंपन्या व्यवसाय करत आहेत हे मान्य असले तरी अपवादात्मक परिस्थितीत लोकांना दिलासा देणे गरजेचे आहे. त्यांनी वाढीव वीज बिलाच्या समस्येतून लवकरात लवकर मार्ग काढावा, अशी आमची अपेक्षा आहे. आंदोलनाची वेळ आल्यास मनसे लोकांसोबत राहील,’ असेही कंपन्यांना बजावण्यात आल्याचे सरदेसाई म्हणाले.

First Published on: September 8, 2020 6:51 AM
Exit mobile version