राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडीओ का वापरला?

राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडीओ का वापरला?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून आज राज्यभरात मनसे कार्यकर्ते मशिदींच्या बाहेर हनुमान चालिसा पठण करत आहेत. यामुळे राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पण या सगळ्यांमध्ये मनसे सैनिकांमध्येच नाही तर तमाम हिंदूंमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी राज यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मशिदींच्या मुद्द्यावरील जुना व्हिडीओ टि्वट केला आहे. यामुळे राज बाळासाहेबांच्याच नावावर आणि त्यांच्या भूमिकांवर मनसेची नवीन दिशा ठरवत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

गुढीपाडव्याला शिवतीर्थावर राज ठाकरे यांनी सभा घेतली होती. या सभेत राज यांनी थेट हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालत मशिदीवरील भोंग्यावर आक्षेप घेतला. नेहमी परप्रांतियांविरोधात दंड थोपटणाऱ्या राज यांच्या या अचानक बदललेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात राज यांनी भाजपचा अजेंडा हाती घेतल्याच्या चर्चा सुरू झाल्या. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनीही राज यांच्या या भूमिकेवर टीकेची झोड उडवली. याचपार्श्वभूमीवर राज यांनी ठाणे येथे उत्तर सभा घेत विरोधकांना आपल्या खास आक्रमक शैलीत उत्तरे देत आपण सुरुवातीपासून हिंदूत्वाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे ठणकावून सांगितले. त्यावेळीही राज यांनी मशिदीवरील भोंग्यावर आक्षेप घेत मशिदींसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे आदेश मनसैनिकांना दिले. राज यांची ही भूमिका शिवसेनेला शह देण्यासाठीच असल्याचे आता बोलले जात आहे.

राज यांनी भाषणात अनेकवेळा हिंदुत्वावरून शिवसेनेला टोला हाणला. महाविकास आघाडी सरकारमध्ये असल्याने शिवसेनेला उघडपणे हिंदुत्वाची भूमिका मांडता येत नाहीये. परिणामी राज यांच्या या हिंदुत्वाच्या अजेंड्यामुळे शिवसेना अस्वस्थ झाली आहे. त्यातच राज यांनी मशिदींवरील बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडीओ टि्वट केला. या ३६ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये बाळासाहेब म्हणतात कि ज्या दिवशी माझे सरकार येईल, त्यावेळी रस्त्यावर केले जाणारे नमाज आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो की जो राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नये, लोकांना उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा कुणाला उपद्रव होत असेल तर त्यांनी मला येऊन सांगावे. आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तायर आहोत. लाऊडस्पीकर मशिदीवरून खाली येतील. बंद म्हणजे बंद …बाळासाहेबांचा हा व्हिडीओ टि्वट करत राज यांनी शिवसेनेचे काम टोचले आहेत. कारण भोंगा प्रकरणी शिवसेनेची पुरती कोंडी झाली आहे.

तर या व्हिडीओमुळे शिवसैनिकांमध्येही आता राज यांच्याबदद्ल कुतुहलता वाढली आहे. तसेच ज्या मराठी माणूस आणि हिंदुत्वाच्या मुद्दयावर बाळासाहेबांनी शिवसेनेची निर्मिती केली त्याच शिवसेनेला आता हिंदुत्वावर बोलताना शंभरवेळा विचार करावा लागत आहे. यामुळे जुन्या शिवसैनिकांमध्येही नाराजी आहे. पण राज यांनी बाळासाहेबांचेच मुद्दे हाती घेत मनसैनिकांमध्ये जो जोश निर्माण केला आहे तो पाहता आता अनेक शिवसैनिक राज यांच्या मनसेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. यामुळे राज बाळासाहेबांच्याच भूमिका वापरून शिवसेनेला आव्हान देत आहेत.

 

 

First Published on: May 4, 2022 4:27 PM
Exit mobile version