पुण्याचे सिंघम पोलीस आणि वाहतूक कोंडीवर जालीम उपाय!

पुण्याचे सिंघम पोलीस आणि वाहतूक कोंडीवर जालीम उपाय!

पुणे पोलिसांची वाहतूक कोंडीवर कारवाई

पुणे-नाशिक व शिरुर-भिमाशंकर या दोन्ही महामार्गांवर राजगुरुनगर शहरात मोठी बाजारपेठ असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहने पार्किंग केली जातात. त्यामुळे या दोन्ही महामार्गांवर वाहतूक कोंडी नित्याचीच होत चालली असताना पोलीस सिंघम उपविभागीय पोलीस आधिकारी गजानन टोनपे व पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी पोलीस दलाची मोठी फौज घेऊन वाहनांवर कारवाई केली. त्यामुळे आता वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या आणि अवैध पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांना आवर घातला जाणार आहे.

पोलिसांनी वापरली सिंघम स्टाईल!

राजगुरुनगर नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात एकेरी वाहतूक, पार्किंग झोन फलक लावून तयार करण्यात आले होते. मात्र, नगरपरिषदेचे हे नियम दुकानदार व शहरातील नागरिक पायदळी तुडवत होते. तरीही नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करत असताना दिवसभर वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे त्याचा त्रास प्रत्येक नागरिकाला होत होता. मानवनिर्मित होणारी वाहतूक कोंडी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी सिंगम स्टाईलचा वापर केला. चार पोलीस आधिकारी आणि दंगल नियंत्रण पथकांच्या दोन तुकड्या घेऊन वाहतूक कोंडीला अढथळा ठरणाऱ्या वाहनांवर त्यांनी कारवाई केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोनपे, पोलीस निरिक्षक अरविंद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक निलेश बडाख, वाहतूक पोलीस बागल आणि दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या या कारवाईमध्ये सहभागी होत्या.

राजगुरुनगर शहरातील दोन्ही मार्गांवर दुकानांसमोर वाहनांची होणारी पार्किंग ही दुकानदारांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी त्या त्या दुकान मालकांनी स्वीकारावी आणि वाहतूक कोंडी होणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यथा दुकानांवरच कायदेशीर कारवाई केली जाईल.

गजानन टोनपे, उपविभागीय पोलीस अधिकारी

नागरिकांची धावपळ!

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून राजगुरुनगर शहरात होणारी वाहतूक कोंडी मोडून काढण्यासाठी पोलीस दल अचानक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. मात्र, यामुळे वाहतूक कोंडीतून कायमची सुटका व्हावी, अशीच भावना यावेळी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत होती.


तुम्ही हे वाचलंत का? – नशेबाजी रोखण्यासाठी पोलीस अधिकार्‍याची शक्कल

First Published on: November 13, 2018 9:28 PM
Exit mobile version