घरमुंबईनशेबाजी रोखण्यासाठी पोलीस अधिकार्‍याची शक्कल

नशेबाजी रोखण्यासाठी पोलीस अधिकार्‍याची शक्कल

Subscribe

जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची मदत

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून नशेच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी मोहीम उघडली असून कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी नशेच्या पदार्थांचा विळखा पाहायला मिळतो. यातील सर्वात महत्त्वाचे आणि एक ठिकाण म्हणजे डोंगरी. डोंगरी परिसरात सर्रासपणे होणारी अंमली पदार्थांची विक्री थांबावी आणि तरुणांना नशेच्या आहारी जाण्यापासून रोखण्यासाठी एका पोलीस अधिकार्‍याने अनोखी शक्कल लढवली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी असे या अधिकार्‍याचे नाव असून या परिसरात राहणार्‍या तरुणांना हाताशी घेऊन त्यांनी समाजात जनजागृती करायला सुरुवात केली आहे. सुशिक्षित तरुणांना हाताशी घेऊन सुरु केलेल्या या मोहिमेला परिसरातल्या नागरीकांबरोबरच इतर ठिकाणाहून पण भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

डोंगरी परिसरामध्ये तरुणांच्या मदतीने धर्माधिकारी यांनी पथनाट्य, भाषण आणि नृत्याच्या सहाय्याने लोकांना आकर्षित करुन जमलेल्या गर्दीला नशेखोरीचे तोटे ते समजावून सांगतात. गेल्या दीड महिन्यापासून त्यांनी डोंगरी परिसरात हा उपक्रम सुरु केला असून स्थानिक रहिवासी असणार्‍या मुलांकडूनसुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. डोंगरी परिसरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी ते पथनाट्य आणि इतर जनजागृतीचे कार्यक्रम राबवतात. तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांनी ही पथनाट्य बसवली आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकाने आतापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये डोंगरी परिसरातल्या नशेबाजांविरोधात केलेल्या कारवायांचा समावेश आहे. त्यामुळे या परिसरातल्या प्रत्येक घराघरात जनजागृती पोहोचणे गरजेेचे असल्याचे पोलिसांचे मत आहे. म्हणूनच त्यांनी या तरुणांच्या पुढाकाराने हे शस्त्र उचलले आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे हे काम करणारी सर्व तरुण मुले ही चांगल्या घराण्यातील असून सुशिक्षित आहेत. रात्रीच्या वेळी असो किंवा भरदिवसा रस्त्यांच्या मधोमध किंवा छोट्याछोट्या विभागांमध्ये ही पथनाट्ये सादर केली जातात. जेणेकरुन जास्तीत जास्त लोकांना ही पथनाट्ये पाहता यावीत. यादरम्यान जमलेल्या गर्दीला नशेखोरीचे काय नक्की परिणाम होतात ते समजावून सांगितले जाते अथवा त्या सगळ्यांना या मोहिमेत सहभागी करुन घेऊन पोलिसांच्या मदतीने परिसरात जनजागृतीसाठी मोर्चा काढला जातो.

साकीनाका पोलीस ठाण्यात असतानासुद्धा मी ही मोहीम राबवली होती. तिथे लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता म्हणूनच इथे गेल्या दीड महिन्यांपासून तरुणांच्या मदतीने ही मोहीम आम्ही सुरु केलेली आहे. यासाठी काम करणारी सगळी तरुण मुले ही चांगल्या घरातील आहेत. लोकांमध्ये जनजागृती करुन हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हाच आमचा प्रयत्न आहे.
-अविनाश धर्माधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंगरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -