यांना बळीराजाच्या करपलेल्या चेहऱ्याऐवजी दीपिकाचा चेहरा हवाय, म्हणूनच.. – राजू शेट्टी

यांना बळीराजाच्या करपलेल्या चेहऱ्याऐवजी दीपिकाचा चेहरा हवाय, म्हणूनच.. – राजू शेट्टी

केंद्र सरकारने नुकत्याच पारित केलेल्या नव्या कृषी विधेयकाला (Farm Bill 2020) देशभरातल्या शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. तसाच तो महाराष्ट्रात देखील होत आहे. त्या पार्श्वभूमीवर २५ सप्टेंबर रोजी देशभरातल्या संघटनांनी देशव्यापी बंद पुकारला आहे. महाराष्ट्रातलेही अनेक शेतकरी या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र, असं असताना २५ सप्टेंबरलाच जाणून बुजून दीपिका पदुकोनला NCB नं चौकशीसाठी बोलावलं, असा दावा करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. केंद्र सरकारच्या कायद्यामधल्या अनेक तरतुदी शेतकरी विरोधी असल्यामुळे त्यांचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांकडून हा भारत बंद पाळला जात आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी ट्वीटच्या माध्यमातून आपला सताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले राजू शेट्टी?

गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या NCB कार्यालयात बॉलिवुडमधल्या अनेक सेलिब्रिटींची सुशांत सिंह राजपूत प्रकरण आणि ड्रग्ज कनेक्शनसंदर्भात चौकशी होत आहे. माध्यमांमध्ये त्याचं व्यापक कव्हरेज देखील होत आहे. मात्र, २५ तारखेला शेकरऱ्यांनी बंद जाहीर केलेला असताना तो झाकला जाण्यासाठीच एनसीबीने दीपिका पदुकोनला २५ तारखेलाच चौकशीसाठी बोलावल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. ‘दीपिका पदुकोनला एनसीबीने २५ सप्टेंबरलाच चौकशीसाठी बोलावलं. याचं कारण म्हणजे याच दिवशी देशभरातले शेतकरी केंद्र सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. माध्यमांनी आंदोलन करणाऱ्या करपलेल्या चेहऱ्याच्या शेतकऱ्यांना दाखवण्याऐवजी दीपिकाच्या चेहऱ्यावर फोकस करून बळीराजाचा रोष दाबण्यासाठीच हा खटाटोप आहे’, असं राजू शेट्टींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

केंद्र सरकारने गेल्याच आठवड्यात लोकसभा आणि राज्य सभेत देखील नवीन शेती विधेयक मंजूर करून घेतलं आहे. त्यामध्ये बाजार समित्यांची मध्यस्थी कमी करण्याबरोबरच शेतकऱ्यांना देशभरात आपला माल कुठेही विकण्याची मुभा देण्यासारख्या तरतुदींचा समावेश आहे. मात्र, यामध्ये किमान आधारभूत किंमतीचा कुठेही उल्लेख नाही. यावर देशभरातल्या शेतकरी संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच, खुल्या बाजारात विक्री करणारा शेतकरी फसवला जाणार नाही, नाडला जाणार नाही याची कोणतीही खातरजमा या कायद्यामध्ये नसल्यावर देखील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे.

First Published on: September 25, 2020 10:17 AM
Exit mobile version