उद्धव ठाकरे जे विचार देतील ते सोनिया गांधींचेच असतील, रामदास कदमांची टीका

उद्धव ठाकरे जे विचार देतील ते सोनिया गांधींचेच असतील, रामदास कदमांची टीका

दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोन्ही गटांनी शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठीचा अर्ज महापालिकेकडे केला आहे. परंतु त्यावर अद्यापही महापालिकेने निर्णय घेतलेला नाहीये. शिवाजी पार्कवरून राजकीय वाद निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेने दोघांनाही परवानगी नाकारली, तर बीकेसीतील मैदानाचा पर्याय शिंदे गटाने ठेवला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे जे विचार देतील ते सोनिया गांधींचेच असतील, अशी टीका शिंदे गटातील आमदार रामदास कदम यांनी केली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच होत असलेला ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होऊ द्यायचा नाही, अशी रणनिती शिंदे गटाने आखली आहे. संपूर्ण देशाला बाळासाहेब ठाकरे एक विचार देत होते. मात्र, आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे विचार देतील ते काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचेच विचार असतील, असं रामदास कदम म्हणाले.

शिवसेना प्रमुखांचे विचार शिवतीर्थावरून देशभरात पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा झाला पाहिजे, असं रामदास कदम म्हणाले. शिवाजी पार्कवरच मेळावा होईल यासाठी सर्व ताकद पणाला लावली जात आहे. परंतु पालिकेने किंवा न्यायालयाने परवानगी दिली नाही तर प्लान बी म्हणून बीकेसीतील मैदानाचा पर्याय शिंदे गटाने खुला ठेवला आहे.


हेही वाचा : उद्योगमंत्री कोण आहेत?; गद्दार…, आदित्य ठाकरेंची रत्नागिरीत टीका


 

First Published on: September 16, 2022 3:50 PM
Exit mobile version