महाविकास आघाडीचा जन्मच मुहूर्तावर झाला नसल्यामुळे वाद, रावसाहेब दानवेंचे वक्तव्य

महाविकास आघाडीचा जन्मच मुहूर्तावर झाला नसल्यामुळे वाद, रावसाहेब दानवेंचे वक्तव्य

महाविकास आघाडी सरकारमधील तीन घटक पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या स्वबळाच्या घोषणेमुळे राष्ट्रवादी-शिवसेनेत नाराजी पसरली असल्याच्या चर्चा सुरु आहे. यावरुन केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीचा जन्मच मुहूर्तावर झाला नसल्यामुळे त्यांच्यात वाद सुरु असल्याचे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. तसेच हे सरकार अमर, अकबर, अँथनीचं सरकार असल्याची खोचक टीकाही दानवेंनी यावेळी केली आहे. काँग्रेसच्या भूमिकेमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये भीती निर्माण झाली असल्याचेही विरोधकांकडून म्हटलं जात आहे.

भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेल्या धुसपूस आणि नाराजीवर दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वारंवार स्वबळाचा नारा देत आहेत. परंतु काँग्रेसची देशात किती ठिकाणी सत्ता आहे. याबाबत काँग्रेसनं तपासलं पाहिजे. तसेच जर काँग्रेस स्वबळाचा नारा देत असेल तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पोटात दुखायचे कारण नाही. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांनी सरकार एकत्र स्थापन केलं आहे. पक्ष एकत्र केला नाही यामुळे प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे.

महाविकास आघाडी सरकार जरी एकत्र चालवत असली तरी आगामी निवडणुकीमध्ये एकत्र लढायचे की स्वबळावर लढायचं हा त्यांच्यातील अंतर्गत प्रश्न आहे. राज्यातील सरकार हे अमर, अकबर,एँथनीचे सरकार असल्याचा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे.

काँग्रेस अस्वस्थ

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची कोंडी होत आहे. काँग्रेस सत्तेत आहे परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांना सत्तेचा लाभ मिळत नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामेही होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. राज्यातील कार्यकर्त्यांकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे असंख्य तक्रारी येत आहेत. यामुळे काँग्रेस अस्वस्थ झाली आहे. काँग्रेसनं कोरोना काळात अनेक कामं केल्यामुळे चांगला जनाधार मिळण्याची शक्यताही नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.

First Published on: July 15, 2021 4:34 PM
Exit mobile version