ईडीच्या फेऱ्यात ठाकरे कुटुंबीय

ईडीच्या फेऱ्यात ठाकरे कुटुंबीय

मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांवर सूडबुद्धीने कारवाई करत असल्याची टीका सातत्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून केली जात आहे. त्यातच अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने मंगळवारी मोठी कारवाई करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली. श्रीधर पाटणकर यांच्यावर केलेली कारवाई ही महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

ईडीने श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील वर्तक नगर भागातील निलांबरी अपार्टमेंटमधील ११ सदनिका जप्त केल्या आहेत. जवळपास ६ कोटी ४५ लाख रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे. पुष्पक बुलियन फसवणूक प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची आहे. पुष्पक बुलियनच्या माध्यमातून श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडने खरेदी केलेल्या ११ सदनिका ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्याशी संबंधित असलेल्या पुष्पक बुलियन आणि ग्रुप ऑफ कंपनीजविरोधात ईडीने ६ मार्च २०१७ रोजी आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला होता. तर त्याआधी या समूहाच्या मालकीची २१ कोटी ४६ लाख रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली होती.

कोण आहेत श्रीधर पाटणकर?
श्रीधर माधव पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे व रश्मी ठाकरे यांचे भाऊ आहेत. ते डोंबिवलीमध्ये राहत असून, ते एक उद्योजक आहेत. श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे या कंपनीचे ते मालक आहेत. वडील माधव पाटणकरही हे सुद्धा उद्योजक होते. त्यांचा रासायनिक उत्पादनांशी संबंधित एक छोटासा कारखाना होता. श्रीधर यांनी वेगळा मार्ग निवडत रियल ईस्टेट क्षेत्रात नशीब आजमावले. मुंबई, उपनगरातील रियल इस्टेटमध्ये एक मोठे नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

नेमके आरोप काय?
महेश पटेल यांनी पुष्पक ग्रुपशी संबंधित २०.०२ कोटी रुपये नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या शेल कंपन्यांकडे हस्तांतरीत केले. त्यांनी पुढे एकूण ३० कोटींचा निधी त्यांची अजून एक शेल कंपनी हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून असुरक्षित कर्ज स्वरूपात पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्माण प्रायव्हेट लिमिटेडकडे ट्रान्सफर केला. याच पैशातून ठाण्याच्या निलांबरी अपार्टमेंटमधील ११ सदनिका खरेदी करण्यात आल्याचा ईडीला संशय आहे.

हा ठाकरे कुटुंबावरील हल्लाच
पाटणकरांवरील कारवाई म्हणजेच ठाकरे कुटुंबावरील हल्ला आहे. महाराष्ट्र ठाकरे कुटुंबाला ओळखतो. याची किंमत आज ना उद्या तुम्हाला चुकवावी लागेलच. एखाद्या राज्यात हरलो असेल तर ज्यांनी पराभव केला त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून अशा प्रकारे दबाव आणणं ही राक्षसी हुकूमशाहीची नांदी आहे.
-संजय राऊत, खासदार, शिवसेना

ठाकरे साहेब उत्तर देऊ शकणार नाहीत
जे डर्टी डझन मी सांगितले त्या डर्टी डझनचा हिशोब आम्ही जनतेसमोर ठेवणार. श्रीधर पाटणकरच्या खात्यातून जे पैसे गेले आहेत, ते समोर आल्यानंतर उद्धव ठाकरे साहेब उत्तर देऊ शकणार नाहीत. किती मनी लॉन्ड्रिंग केले हे श्रीधर पाटणकरांनी घोषित करावे. नाहीतर पुढच्या कारवाईला तयार राहावे. उद्धव ठाकरेंना रात्री झोप लागणार नाही.
-किरीट सोमय्या, नेते, भाजप

तपास यंत्रणांचा गैरवापर मोठा प्रश्न
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा सध्या देशातील सर्वात मोठा प्रश्न बनला आहे. आपण जी आकडेवारी दिली ती आकडेवारी खरी असेल तर ती स्वच्छपणे सांगते की राजकीय किंवा अन्य हेतूने कुणालातरी त्रास देण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. खरे सांगायचे म्हणजे गेल्या 5 ते 6 वर्षात ही ईडी नावाची संस्था इथे बसलेल्या कुणाला माहिती नव्हती. मात्र, आता ही ईडी गावागावात पोहोचली आहे.
– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

भाजपला हे महागात पडेल
केंद्रातील भाजप सरकार ही महाविकास आघाडी सरकारला घाबरली आहे. तपास यंत्रणेचा सातत्याने गैरवापर करत आघाडी सरकामधल्या नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न भाजप सातत्याने करत आहे. मात्र, सरकारला धोका नाही. भाजपने यंत्रणेचा गैरवापर करणे सोडून देत सामान्य जनतेकडे लक्ष द्यावे. भाजपला हे महागात पडेल.
-नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

First Published on: March 23, 2022 5:45 AM
Exit mobile version