आठवलेंनंतर आता रासपला भाजपाचा ठेंगा?

आठवलेंनंतर आता रासपला भाजपाचा ठेंगा?

रामदास आठवले यांच्या ‘रिपाई’नंतर आता महादेव जानकर यांच्या ‘रासप’ला देखील लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाकडून जागा सोडण्यात येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आठवलेंनंतर महादेव जानकरांनादेखील शिवसेना-भाजपा युती ठेंगा दाखवण्याची शक्यता वर्तवली जाते. भाजपाने संधी दिली तर बारामतीमधून निवडणूक लढवणार असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले होते. मात्र, रासपलाही या निवडणुकीत जागा सोडण्याची भाजपाची मानसिकता नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघातून नुकतेच भाजपामध्ये प्रवेश केलेल्या रणजित सिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

…म्हणून जानकरांना उमेदवारी नाकारणार

महादेव जानकर यांना जर बारामतीमधून निवडणूक लढवायची असल्यास त्यांनी भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढावी, असे त्यांना सांगण्यात आले आहे. मात्र जानकर हे स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास तयार आहेत त्यामुळे जानकर यांना भाजपाने तिकीट नाकारले आहे. महादेव जानकर यांनी जागावाटपाबाबत सकारात्मक निर्णय घ्या अन्यथा आम्हाला चौथी आघाडी करावी लागेल असा इशारा दिला होता. त्यामुळे आता जानकर काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

रामदास आठवले यांच्या रिपाईसह इतर मित्रपक्षांना लोकसभा निवडणुकीमध्ये किती जागा मिळतील? याची चर्चा सुरू होती. मात्र, आठवलेंच्या पक्षाचा लोकसभा नाही तर विधानसभा निवडणुकीसाठी विचार होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि लोकसभेतून आठवलेंचा पत्ता कट केल्याची चर्चा सुरु झाली.

First Published on: March 21, 2019 7:05 PM
Exit mobile version