“बदलीसाठी घटस्फोटही घ्यायला तयार”; आरोग्य सेविकेचा ‘झेडपी सीईओ’समोर आक्रोश

“बदलीसाठी घटस्फोटही घ्यायला तयार”; आरोग्य सेविकेचा ‘झेडपी सीईओ’समोर आक्रोश

नाशिक : बदलीसाठी मी घटस्फोटही घ्यायला तयार आहे. माझे कुटूंब उध्द्वस्त करायला तयार आहे. पण मला बदली द्या अशी भुमिका सीईआेंसमोर घेत एका आरोग्य सेविकेने आपला संताप व्यक्त केला. शुक्रवारी (दि.26) होरायझन अकॅडमी, गंगापूर रोड, नाशिक याठिक़ाणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची बदली प्रक्रिया पार पडली. बदली प्रक्रियेदरम्यान शुक्रवारी (दि.26) मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवक-सेविकांनी संताप व्यक्त केला.

आदिवासी (पेसा) क्षेत्रात गत 10 वर्षापेक्षा जास्त काळ काम केलेल्या आरोग्य सेवक-सेविकांना अपेक्षेप्रमाणे बदल्या न मिळाल्याने त्यांनी सीईआेंसमोर माईकचा ताबा घेत संताप व्यक्त करीत आक्रोशाद्वारे भावनांना वाट मोकळी करुन दिली. आरोग्यसेविकांनी घेतलेल्या भुमिकेवर सीईआेंनी नाराजी व्यक्त केली. याठिकाणी घोषणाबाजी करु नका, बदल्यांची प्रक्रिया शासन निर्देशांप्रमाणे करण्यात येत आहे असे सीईआेंनी स्पष्ट केले. मात्र तरीही आरोग्य सेविकांनी आपल्या भुमिकेूवर ठाम होत्या.

आरोग्य सेविकांनी सीईआेंसमोर भुमिका मांडतांना सांगितले की, पेसा क्षेत्रात आम्ही 20 ते 30 वर्षांपासून काम करीत आहोत. आम्हाला न्याय कधी मिळणार? आमच्या महिन्याचा लेखाजोखा प्रशासनाकडून पूर्ण केला जातो मग बदली प्रक्रियेत घोळ कसा केला? असा प्रश्न आरोग्य सेविकांनी केला. आम्ही तळागाळात काम करतो, मुख्यालयाशी आमचा जास्त संबंध येत नाही. प्रशासनाकडून आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रशासनाकडूनच अन्याय होत असल्याने न्याय कुणाकडे मागायचा? असा प्रश्न आरोग्य सेविकांनी विचारला.

दिवसभरात आरोग्य विभागातंर्गत विविध संवर्गातील ५९, बांधकाम विभाग ३, पशुसवंर्धन ८, शिक्षण विभाग ६, महिला व बालकल्याण विभागात १५ अशा एकूण ९१ बदल्या झाल्या आहेत. आरोग्य विभागाच्या बदली प्रक्रीयेदरम्यान विनंती बदल्यांमध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल केलेल्या कर्मचार्‍यांनाच संधी दिली जात आहे.

प्रशासनाकडून अन्याय; न्याय कुणाकडे मागणार?

एका आरोग्य सेविकेने तर अपेक्षित बदलीसाठी प्रमाणपत्रच हवे असेल तर मी माझ्या पतीसोबत घटस्फोट घ्यायला तयार आहे असे सांगत आक्रोश व्यक्त केला. प्रशासनाकडून अपेक्षित बदली मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र इतके वर्ष प्रामाणिकपणे सेवा करुनही न्याय मिळाला नसल्याने मी अटीशर्तींचे पालन करीत पतीसोबत घटस्फोट घ्यायलाही तयार आहे. प्रशासनाच्या अटीशर्तीं पूर्ण करण्यासाठी माझे कुटूंब उध्वस्त करायला तयार आहे. मात्र प्रशासनाने बदली द्यावी असे म्हणत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

बदलीसाठी अनेक कर्मचार्‍यांनी वेद्यकीय प्रमाणपत्रे सादर केली आहेत. या प्रमाणपत्रांची तपासणी जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत करण्यात येणार आहे. यावेळी संबंधित कर्मचार्‍याची शारिरीक तपासणीही करण्यात येणार आहे. यावेळी काही तफावत आढळल्यास अतवा बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे आढळून आल्यास संबंधित कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात येणार. : आशिमा मित्तल, सीइओ, जिल्हा परिषद 

पेसे घेऊन बदल्या करण्यात आल्याचा आरोप

काही आरोग्य सेवक कर्मचार्‍यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर पेसे घेऊन बदल्या करण्यात आल्याचा आरोप केला. आम्हाला कळविले असते तर आम्ही सुध्दा पैसे दिले असते, आमच्यावर अन्याय का? अशीही भुमिका या कर्मचार्‍यांनी घेतली. काही जणांनी खोटी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करुन बदल्या करुन घेतल्या असा आरोपही या नाराज कर्मचार्‍यांनी केला आहे.

शासनाच्या निर्देशांप्रमाणे 5 टक्के बदल्या

18 मे 2023 च्या शासन निर्देशांनुसार 5 टक्के विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. अगोदर प्रशासकीय बदल्या 10 टक्केे आणि विनंती बदल्या 10 टक्के असा आदेश होता. मात्र सुधारित 18 मे 2023 च्या शासननिर्देंशाप्रमाणे केवळ 5 टक्केच बदल्या करण्यास परवागनी होती. त्यानुसार एकूण 59 बदल्या करण्यात आल्या आहेत.

रात्री 1 पर्यंत तयारी करुनही गोंधळ का?

25 तारखेला रात्री 1 पर्यंत आरोग्य विभागात बदली प्रक्रियेची तयारी पूर्ण करण्याचे काम चालु होते. मग एवढे काम करुनही बदली प्रक्रियेत गोंधळ का? पेसा क्षेत्रातील आरोग्य सेविकांवर अन्याय का? असा प्रश्न काही आरोग्य सेविकांनी यावेळी विचारला.

First Published on: May 27, 2023 2:51 PM
Exit mobile version