गुवाहटीत शिवसेनेचा गनिमी कावा?, बंडखोर आमदार मुंबईत आल्यावर खेळी उलटविण्याची रणनीती

गुवाहटीत शिवसेनेचा गनिमी कावा?, बंडखोर आमदार मुंबईत आल्यावर खेळी उलटविण्याची रणनीती

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच या संदर्भात क्षणाक्षणाला नवीन माहिती समोर येत असल्याने राजकीय वर्तुळातील संभ्रमावस्था कायम आहे. शिंदे यांच्या गोटात सामील होण्यासाठी शिवसेना आमदारांची रीघ लागल्यामुळे आमदारांना शिंदेंच्या तंबूत पाठवणे हा शिवसेनेचा गनिमी कावा असल्याची चर्चा आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीची धामधूम सुरु असताना सोमवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन गुजरातच्या सुरत येथील हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाल्याचे चित्र निर्माण झाले. एकनाथ शिंदे यांनी बंड करत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजसोबत सरकार स्थापन करण्याची मागणी केली आहे. यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल जनतेला संबोधित करताना एकनाथ शिंदे यांच्यावर पलटवार केला. मी मुख्यमंत्री नको असेल तर समोर येऊन सांगा, मी तात्काळ पायउतार होण्यास तयार आहे. मात्र पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचा असावा, अशा शब्दात ठाकरे यांनी शिंदे यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला आहे. उद्धव तहक्रे यांच्या प्रस्तावाला शिंदे यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले.

दरम्यान, शिंदे यांच्या गोटात सामील होण्यासाठी शिवसेना आमदारांची रीघ लागल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र हा शिवसेनेचा गनिमी कावा असल्याचे मानण्यात येते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या अनेक आमदारांना शिंदे यांचे बंड मान्य नाही आणि त्यांना परत यायचे आहे, मात्र ते भीतीच्या छायेत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या आमदारांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी काही आमदारांना उद्धव ठाकरे यांनी तेथे पाठविल्याची माहिती आहे. हे आमदार शिंदे गोटातील आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार असून बंडखोर आमदार मुंबईत परतल्यावर ते आपले पत्ते उघड करतील, अशी शक्यता आहे.

विधानसभा उपाध्यक्ष, राज्यपालांकडे करावी लागणार ओळख परेड –

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार अल्पमतात येऊन त्यांनी राजीनामा दिला तर नव्या सरकारच्या स्थापनेवेळी विधानसभा उपाध्यक्ष किंवा राज्यपालांकडे शिंदे गटातील आमदारांची ओळख परेड होईल. यावेळी शिवसेना सोडून वेगळा गट तयार केलेल्या पत्रावर आमदार यांनी सह्या केल्या असून त्यांनी केलेल्या सह्या खऱ्या आहेत का, त्यांनी स्वखुशीने सह्या केल्या का, कुणाच्या दबावामुळे सह्या केल्या का, अशा प्रश्नांची उत्तरे प्रत्येक आमदाराला द्यावी लागणार आहेत. यावेळी शिंदे यांच्यासोबत नक्की किती आमदार आहेत हे स्पष्ट होणार आहेत.

विश्वास दर्शक ठरावाच्यावेळी कसोटी –

ठाकरे सरकारच्या विरोधात अविश्वास दर्शक ठराव आल्यावर शिंदे गटाच्या आमदारांची कसोटी लागणार आहे. यावेळी जर शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांचा व्हीप लागू होणार असेल तर शिंदे गटाची अडचण होऊ शकते. शिवाय विश्वास दर्शक ठरावावेळी शिंदे यांच्या सोबत असलेले काही आमदार फुटले तर शिंदेंचे बंड अयशस्वी ठरू शकते.

First Published on: June 23, 2022 9:14 PM
Exit mobile version