नातेवाईकच बनले रुग्णांचे ‘केअर टेकर’; स्वतःच केली मलमपट्टी तर सलाईनहातात घेऊन वॉर्डची शोधाशोध

नातेवाईकच बनले रुग्णांचे ‘केअर टेकर’; स्वतःच केली मलमपट्टी तर सलाईनहातात घेऊन वॉर्डची शोधाशोध

नाशिक : कर्मचार्‍यांच्या संपाच्या सातव्या दिवशी अर्थात सोमवारी (दि.२०) जिल्हा रुग्णालयात आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आल्याचे दिसून आले. अनेक रुग्णांवर उपचारासाठी कर्मचारी नसल्याने नातेवाईकांनाच आपल्या रुग्णांची काळजी घ्यावी लागली. प्रसंगी मलमपट्टीसह सलाईन बॉटल हाती घेत वॉर्ड शोधण्याची वेळ आली होती. परिणामी रुग्णांसह नातेवाईकांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला.

राज्य कर्मचारी सोमवारी सकाळपासून संपावर होते. त्यात जिल्हा रुग्णालयातील कर्मचारीसुद्धा सहभागी झाले होते. रुग्णालयात कर्मचारी नसल्याने कंत्राटी कर्मचार्‍यांवर ताण आल्याचे दिसून आले. शिवाय, रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना केसपेपरपासून डॉक्टर शोधणे, मलमपट्टी करणे, सलाईनसह रुग्णांना बेड्सपर्यंत नेण्याची कामे रुग्णांच्या नातेवाईकांनाच करावी लागली.

विशेष म्हणजे, संपाच्या सातव्या दिवशी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशव्दाराच्या एका बाजूचे गेट बंद करुन आंदोलन सुरू होते. त्यामुळे अनेक रुग्णवाहिकांना अडथळा निर्माण झाला. ही बाब जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात यांना समजताच त्यांनी विधायक मार्गाने आंदोलन करा मात्र, रुग्णांना वेठीस धरू नका, असे सांगितले. त्यानंतर आंदोलकांनी गेट उघडले.

सायंकाळी संप मागे घेतल्याचे माहित असूनही अनेक कर्मचारी आपत्कालीन व्यवस्थेत असतानाही हजर झाले नसल्याचे चित्र होते. संप मिटल्याने कर्मचार्‍यांनी किमान रात्रीच्या ड्युटीला तरी येणे अत्यावश्यक होते. कर्मचार्‍यांना रुग्णांप्रती कोणतीही आपुलकी नाही. त्यांना फक्त वेतन व जुनी पेन्शन हवी आहे. ज्यांच्यासाठी रुग्णालय आहे त्यांचीच हेळसांड सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया रुग्णाच्या नातेवाईकाने दिली.

भरतीप्रक्रिया स्थगित

संपामुळे जिल्हा रुग्णालयातील कामकाज ठप्प होवू नये, यासाठी आपत्कालीन परिस्थितीत रोजंदारी तत्वावरील पर्यायी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यासाठी जिल्हा रुग्णालयात सोमवारी (दि.२०) ६७ जणांनी अर्जसुद्धा केले होते. मात्र, सायंकाळी कर्मचार्‍यांचा संप स्थगित झाल्याचे समजताच जिल्हा रुग्णालयात ही भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली. यातील पात्र अर्जदारांची रिक्त जागांवर भरती केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

First Published on: March 21, 2023 1:09 PM
Exit mobile version