शालीमार चौकात साकारली संसद भवनाची प्रतिकृती

शालीमार चौकात साकारली संसद भवनाची प्रतिकृती

शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जयंती उत्सवानिमित्त चौकाचौकात आकर्षक देखावे साकारण्यात येत असून शालीमार येथे साकारण्यात आलेला दिल्लीतील संसद भवनाचा देखावा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधामुळे जयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला मात्र यंदा निर्बंध हटविण्यात आलेल्या निर्बंधमुक्त वातावरणात मोठया उत्साहात जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. शालीमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळयाजवळ दिल्ली येथील संसद भवन गॅलरी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेचा सरनामा याचा भव्य देखावा साकारण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक आनंद सोनवणे यांच्या संकल्पनेतून कला दिग्दर्शक सुनील समजीसकर यांनी हा देखावा साकारला आहे. या देखाव्यासाठी ४० बाय ५३ फुट व्यासपीठ साकारण्यात आले असून देखाव्याची उंची ४५ फूट आहे. या उत्सव समितीचे संयोजन उत्सव समितीचे अध्यक्ष अर्जुन पगारे, उपाध्यक्ष बब्बु शेख, खजिनदार अभी पगारे, सचिव बाळासाहेब शिंदे, संजय खैरनार, संजय साबळे, दिलीप साळवे, मदन शिंदे, पप्पू तेजाळे आदी करत आहेत.विविध वसाहतींमध्ये उभारलेल्या स्वागत कमानी, स्टेज तसेच निळे ध्वज घेऊन धावणार्‍या रिक्षा यामुळे परिसर जयंतीमय झाला आहे. उपनगर, नारायणबापू नगर, देवळालीगाव, भगूर, देवळाली कॅम्प, सिन्नर फाटा, बिटको चौक आदी ठिकाणी भव्य स्टेज उभारून त्यांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. रस्त्यांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. जयंतीचा कार्यक्रम निर्विघ्न पार पडावा यासाठी नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्पच्या पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. जयंतीनिमित्त शहराच्या विविध भागातून मिरवणूकाही काढण्यात येणार आहे.

समितीचा अनोखा उपक्रम
यंदा समितीने शिवाजीरोडचा संपूर्ण परिसर होर्ल्डिंग मुक्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिसरात एलईडी वॉल लावण्यात येणार आहे या वॉलवर शुभेच्छा संदेश देण्यात येणार आहे. रात्री ११.४५ वाजता पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बुध्दवंदना करण्यात येऊन पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.

 

First Published on: April 13, 2022 1:22 PM
Exit mobile version