विद्यावेतनासाठी निवासी डॉक्टर करणार ‘रास्ता रोको’

विद्यावेतनासाठी निवासी डॉक्टर करणार ‘रास्ता रोको’

केमोथेरपी

राज्यातील हजारांपेक्षा जास्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामधील निवासी डॉक्टरांचे गेल्या दोन महिन्यांपासून विद्यावेतन थकले आहे. याच्याच निषेधार्थ मुंबईसह राज्यभरात सरकारी मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामध्ये लातूर, आंबेजोगाई, नागपूर येथील निवासी डॉक्टरांनी हाताला काळ्या फिती बांधून मानधनाच्या मुद्यावर आंदोलन केले आहे. तर, पैशाअभावी घाटी हॉस्पिटल परिसरात निवासी डॉक्टरांनी फळे आणि वडापाव विकत निषेध व्यक्त केला आहे.

मुंबईसह राज्यभरात चिघळणार आंदोलन

याच पार्श्वभूमीवर मुंबईतील निवासी डॉक्टरांनीही त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील काही मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या निषेधाच्या समर्थनार्थ मुंबईतील निवासी डॉक्टर्स शीव हॉस्पिटलच्या आवारात फळ विकणार आहेत. तर, याविषयी गुरुवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्यासोबत बैठक होणे अपेक्षित आहे. त्या बैठकीतून काहीही साध्य झाले नाही तर आणि ठोस निर्णय न झाल्यास येत्या गुरुवारी मुंबईतील निवासी डॉक्टर रस्त्यावर उतरुन जे.जे फ्लायओव्हर अडवण्याची शक्यता आहे. त्यासोबतच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या बंगल्याला घेराव घालण्याची देखील शक्यता असल्याचे केंद्रीय मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. लोकेशकुमार चिरवटकर यांनी स्पष्ट केले आहे.

फळ विकत करणार सरकारविरोधात निषेध

वारंवार आपल्या मागण्यांसाठी आंदोलने करुनही निवासी डॉक्टरांना फक्त आश्वासने मिळाली आहेत. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी याबाबत राज्य सरकारला पत्र दिले होते. त्यात २० डिसेंबर २०१८ पर्यंत सरकारने आमच्या मागण्यांबाबत विचार करावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देण्यात आला होता. पण, या पत्रावर काहीच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे, मंगळवारी निवासी डॉक्टर शीव हॉस्पिटलच्या आवारातच सरकारविरोधात निषेध करत फळ विकणार आहेत.

विद्यावेतन आणि इतर समस्यांसाठी सोमवारपासून काही राज्यातील मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टरांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांना मुंबईतून ही सपोर्ट मिळणार आहे. त्यामुळे आता तरी सरकारने तात्काळ याविषयी निर्णय घेणे गरजेचे आहे. नाहीतर संपूर्ण राज्यभरात हे आंदोलन चिघळेल. गुरुवारी डिएमईआर आणि मंत्री यांच्यासोबत आमची बैठक अपेक्षित आहे. त्या बैठकीत जर ठोस निर्णय झाला नाही तर पुढे जी पण काय परिस्थिती ओढावेल त्यासाठी सरकार स्वत: जबाबदार असणार आहे. त्यानंतरही मागण्या पूर्ण नाही झाल्या तर गुरुवारीच निवासी डॉक्टर रास्ता रोको करतील. तसेच मंत्र्यांच्या बंगल्याला देखील घेराव घालतील.  – डॉ. लोकेशकुमार चिरवटकर, केंद्रीय मार्ड संघटनेचे अध्यक्ष

निवासी डॉक्टरांचे काही प्रश्न असतील तर त्यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल. – डॉ. प्रवीण शिनगारे, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (डिएमईआर) संचालक


वाचा – ग्रामीण भागातील उपकेंद्रात उपलब्ध होणार आयुर्वेदिक डॉक्टर्स

वाचा – बोगस डॉक्टर: आरोग्य सेवा पोखरणारा कर्करोग


 

First Published on: December 24, 2018 7:43 PM
Exit mobile version