बारावीचा निकाल आज, विद्यार्थ्यांना १७ जून रोजी मिळणार गुणपत्रिका

बारावीचा निकाल आज, विद्यार्थ्यांना १७ जून रोजी मिळणार गुणपत्रिका

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल २०२२ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार ८ जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर झाल्यानंतर १७ जून रोजी विद्यार्थ्यांना दुपारी ३ वाजता त्यांची गुणपत्रिका शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण ऑनलाईन झाल्याने परीक्षाही ऑनलाईन घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती, मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता राज्य मंडळाने परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली होती. शिक्षण ऑनलाईन व परीक्षा ऑफलाईन यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबाबत तणावाचे वातावरण होते. तणावाच्या वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याने परीक्षेच्या निकालाकडे सार्‍याच विद्यार्थ्यांचे डोळे लागले होते. या धर्तीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेतलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल ८ जून रोजी जाहीर करण्याचा निर्णय राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आला.

हा निकाल विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर झाल्यानंतर १७ जून रोजी विद्यार्थ्यांना दुपारी ३ वाजता त्यांची गुणपत्रिका शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
https://hsc.mahresults.org.in
https://lokmat.news१८.com
https://www.indiatoday.in/education-today/results
https://mh१२.abpmajha.com
https://www.tv९marathi.com/board-result-registration-for-result

गुण पडताळणीसाठी १० जूनपासून करता येईल अर्ज
गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या http://verification.mh-hsc.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरून स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गुणपडताळणीसाठी १० ते २० जून २०२२ पर्यंत व छायाप्रतीसाठी १० ते २९ जून २०२२ पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल.

पुरवणी परीक्षेसाठीही करता येणार अर्ज
पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी १० जूनपासून विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत.

First Published on: June 8, 2022 6:30 AM
Exit mobile version