सध्या तरी सरकारला कोणताही धोका नाही

सध्या तरी सरकारला कोणताही धोका नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान

राज्यातील ठाकरे सरकार फार काळ टिकणार नाही, असे भाजपचे नेते ठाम शब्दांत सांगत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या तरी सरकारला कोणताही धोका नाही, असे म्हटले आहे. शुक्रवारी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी हे विधान केले.

यावेळी राज्य सरकारच्या स्थिरतेबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, सध्या तरी सरकारला कोणताही धोका नाही. गुंड गजा मारणेची मिरवणूक आणि चोरट्यांचा पाहून पळालेले पोलीस या घटनांवरून पुणे शहर पोलिसांचे कान टोचले. गुन्हेगाराची मिरवणूक निघण्याच्या घटना घडतात त्याच्याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी गुन्हा, चोरी घडणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी, असे अजितदादांनी सांगितले.

पूजा चव्हाण आत्महत्येबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. चौकशी कशी करावी, काय करावी हे मी सांगू शकत नाही. मी गृहमंत्री नाही, मी उपमुख्यमंत्री आहे. तुम्ही पत्रकार नेहमी याबाबत विचारतात, पण मी नेहमी सांगतो, चौकशी चालू आहे, चौकशीतून सत्य बाहेर येईल.

दोन मार्क महागात पडले होते
लालबहादूर शास्त्रींनी रेल्वेचा अपघात झाल्यानंतर राजीनामा दिला होता. पण आता लालबहादूर शास्त्रीजींशी तुलना होऊ शकते का? त्या त्या वेळी त्यांनी घेतलेली भूमिका आपल्याला माहिती आहे. प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. पूर्वीच्या काळात मला माहितीय, मी त्यावेळी राजकारणात नव्हतो, केवळ कोर्टाने ताशेरे ओढले तरी राजीनामा द्यावा लागत होता. घरातल्या मुलीचे दोन मार्क वाढवले, तरी राजीनामा द्यावा लागत होता. अशा गोष्टी मागे झालेल्या आहेत. आता काय होतंय, काय घडतंय हे आपण पाहतोय, असे अजित पवार म्हणाले.

प्रेस घ्यायला सांगेन
धनंजय मुंडे समोर येऊन बोलले, मात्र संजय राठोड अजून बोलत नाहीत. नॉट रिचेबल आहेत? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, बरोबर आहे, माझी भेट झाल्यावर मी सांगेन, सगळे पत्रकार तुमची अतिशय आत्मीयतेने वाट बघत आहेत, एक प्रेस घेण्यास सांगेन, असे अजित पवार म्हणाले.

First Published on: February 20, 2021 1:30 AM
Exit mobile version