कशेडी घाटात रस्ता खचला

कशेडी घाटात रस्ता खचला

कशेडी घाट

मुंबई-गोवा महामार्गावर येथून जवळ कशेडी घाटात भोगाव येथे 100 मीटर परिसरातील रस्ता एक-दीड फुटाने खचला आहे. रस्ता व लगतचा भाग दरीच्या बाजूला सरकताना दिसत आहे. या ठिकाणी पडलेल्या भेगेत पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात झिरपून भेग वाढत आहे. गेल्या पाच वर्षांपासून पावसाळ्यात या ठिकाचा हा रस्ता वेगाने खचताना समोर येत आहे. तरी त्यावर ठोस उपाय योजले जात नाहीत, त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

कोकणात जाणारा हा एकमेव मुख्य मार्ग आहे. सध्या या मार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. महामार्गाच्या खालून वाहतुकीसाठी बोगद्याचे काम चालू असले तरी अस्तित्वात असलेला हाच मार्ग पर्यायी म्हणून उपलब्ध राहणार आहे. मात्र या मार्गाची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली असल्याने पावसाळ्यात हा मार्ग वाहतुकीसाठी कमालीचा धोकादायक ठरू लागला आहे. येलंगेवाडी, भोगाव या गावांनादेखील हा रस्ता खचू लागला आहे. त्यामुळे भविष्यात दुष्परिणाम भोगावे लागण्याची शक्यता आहे. दरवर्षी हा रस्ता खचत असतो. त्यामुळे याबाबत भूगर्भ तज्ज्ञांकडून पाहणी करून अभ्यास केला जावा, अशी वारंवार मागणी होऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

सध्या हा मार्ग खचून दरीच्या मार्गाने सरकत असल्याने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकत आहे. याची माहिती मिळताच तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, नायब तहसीलदार समीर देसाई, तसेच सरपंच राकेश उतेकर, पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी वाहतूक सुरक्षितरित्या सुरू राहण्यासाठी वाहतुकीचे नियोजन केले आहे. येथून वाहने अत्यंत धीम्या गतीने पुढे सरकत आहेत.

रविवारी हा रस्ता खचला असून बॅरिकेड्स लावून दिवस-रात्र आमचे आमचे कर्मचारी वाहतुकीचे नियोजन करीत आहेत. कोणताही धोका उद्भवू नये म्हणून त्या भागात एकेरी वाहतूक सुरू आहे.
– प्रशांत जाधव, पोलीस निरीक्षक

दरवर्षी हा रस्ता खचतो. आम्ही मुंबईहून कोकणात जात असताना भीती वाटते. रस्ता खचल्याने अचानक काहीही होऊ शकते. प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी.
-विजय पवार, वाहनचालक

खचलेल्या या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे. या कामाची जबाबदारी रिलायन्स कंपनीची असून काम युद्धपातळीवर करण्यात येणार आहे.
-श्री. गायकवाड, उप अभियंता, नॅशनल हायवे

First Published on: July 30, 2019 4:10 AM
Exit mobile version