भाविकांसाठी आंगणेवाडी यात्रा मार्ग सील, फक्त आंगणे कुटुंबातील व्यक्तींना प्रवेश

भाविकांसाठी आंगणेवाडी यात्रा मार्ग सील, फक्त आंगणे कुटुंबातील व्यक्तींना प्रवेश

भाविकांसाठी आंगणेवाडी यात्रा मार्ग सील, फक्त आंगणे कुटुंबातील व्यक्तींना प्रवेश

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीची यात्रा येत्या ६ मार्च रोजी शनिवारी होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी केवळ आंगणे कुटुंबीय मर्यादितच ही यात्रा होणार आहे. आंगणे कुटुंबातील ५०-५० व्यक्तींना मंदिरात तपासणी करून प्रवेश दिला जाणार असून अन्य भाविकांना यात्रेत अथवा मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. अन्य भाविकांसाठी आंगणेवाडीत येणारे मालवण, कणकवली, मसुरे हे मार्ग पोलीस प्रशासनाच्या वतीने सील केले जाणार आहेत. यात्रा कालावधीत मंदिर परिसरात एकही दुकान अथवा विक्रेताही असणार नाही, अशा सक्त सूचना सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत .

प्रथे प्रमाणे दोन महिन्यांपूर्वी आंगणे कुटुंबीयांनी यावर्षीची श्री भराडी देवीच्या जत्रेची ६ मार्च ही तारीख जाहीर केली. मात्र कोरोना पार्श्वभूमीवर यात्रा केवळ आंगणे कुटुंबियांच्या उपस्थितीत होऊन मंदिरातील धार्मिक विधी पार पडतील तसेच भाविकांना यात्रेत प्रवेश नसल्याचे आंगणे कुटुंबियांनी स्पष्ट केले होते.

प्रशासनानेही आंगणे कुटुंबीय सोडून अन्य भाविकांना यात्रा रद्द झाल्याचे जाहीर केले होते. दरम्यान राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घातले. या पार्श्वभूमीवर आंगणे कुटुंबीय मर्यादित होणाऱ्या आंगणेवाडी यात्रेत आंगणे कुटुंबीय यांचीही एकाचवेळी गर्दी होऊ नये या दृष्टीने जिल्हा प्रशासन आणि आंगणे कुटुंबीय मंडळ यांची यात्रा नियोजनाची महत्वपूर्ण बैठक आंगणेवाडी येथे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी पार पडली.

बैठकीनंतर जिल्हाधिकारी यांनी मंदिर परिसराची पाहणी करत आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी झालेल्या चर्चेतून जत्रेदिवशी पहाटे ४ वाजल्यापासून दर्शनास येणाऱ्या आंगणे कुटुंबीय व्यक्तींची मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोरोना विषयक आरोग्य तपासणी आरोग्य विभाग आणि आंगणेवाडी मंडळ यांच्या वतीने करण्यात येईल. तापमान आणि ऑक्सिजन तपासणी नंतरच मंदिरात प्रवेश देण्यात येईल. एकाचवेळी मंदिर आणि मंडप परिसरात ५० पेक्षा जास्त व्यक्ती असणार नाहीत याची काळजी प्राधान्याने घ्यावी, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी. के मंजुलक्ष्मी यांनी प्रशासन आणि आंगणेवाडी मंडळास दिल्या.

दर्शनासाठी येणाऱ्या आंगणे कुटूंबियांना त्यांची ओळखपत्रे देण्यात येणार आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, आंगणे कुटुंबीय, आंगणे कुटुंबातील सुना, आंगणे कुटुंबातील लग्न झालेल्या मुली व त्यांचे कुटुंबीय यांनाच यात्रा कालावधीत मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जाईल, असे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी सांगितले.

मंदिराकडे येणाऱ्या मालवण, मसुरे आणि कणकवली अशा तिन्ही मार्गावर बॅरिगेट्स लावून पोलीस प्रशासन मार्ग सील करणार आहे. अन्य भाविकांना यात्रेत आणि मंदिरात प्रवेश नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. आंगणे कुटुंबियांचे ओळखपत्र असलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त अन्य कोणासही प्रवेश देण्यात येणार नाही, अशा सक्त सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत.

मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात येईल. मंदिर परिसरात कोणत्याही वाहनाला प्रवेश दिला जाणार नाही. तसेच जत्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ७ मार्च रोजी दुपारपर्यंतच पोलीस बंदोबस्त आणि आरोग्य कर्मचारी तैनात राहणार असल्याचेही यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मंदिर परिसरात कोणतेही दुकान, स्टॉलना परवानगी नाही 

दरवर्षी आंगणेवाडी यात्रेत विविध ठिकाणाहून आलेले फिरते व्यापारी, स्थानिक व्यापारी आपले विविध खाद्यपदार्थांचे, वस्तूंचे, खेळणी, कपडे यांचे स्टॉल मंदिर परिसरात उभारतात. मात्र यावर्षी ही जत्रा आंगणे कुटुंबियांपुरतीच मर्यादित राहणार असल्याने तसेच कोरोना पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये. या कारणास्तव मंदिर परिसरात एकही दुकान अथवा स्टॉल उभारता येणार नाही. तसेच मंदिर परिसरात आधीपासूनच स्थानिक ग्रामस्थांचे जे कायमस्वरुपी हॉटेल, दुकाने आणि स्टॉल आहेत ते देखील जत्रे दिवशी बंद राहतील, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत.

नेते मंडळी, पत्रकार यांनाही प्रवेश नाही

आंगणेवाडी यात्रा फक्त आंगणे कुटुंबीय मर्यादित आहे. अन्य कोणालाही यात्रेत प्रवेश नाही. राजकीय नेतेमंडळी अथवा पत्रकार यांनाही यात्रेत मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.


हेही वाचा – आणखी एका नेत्याचे अश्लील व्हिडिओ व्हायरल


 

First Published on: March 3, 2021 9:04 AM
Exit mobile version