‘आरटीई’चे सर्व्हर डाउन; शिक्षण उपसंचालक कार्यालयात अधिकारीच उपस्थित नसल्याने दाराला चिटकवले निवेदन

‘आरटीई’चे सर्व्हर डाउन; शिक्षण उपसंचालक कार्यालयात अधिकारीच उपस्थित नसल्याने दाराला चिटकवले निवेदन

नाशिक : शिक्षणाचा अधिकार अर्थात राईट टू एज्युकेशन अंतर्गत सध्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, हे फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन यंत्रणेत अनेक त्रुटी असून, आरटीईचे सर्व्हर संथगतीने चालत आहे. या त्रुटी दूर कराव्यात या मागणीचे निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात गेले होते. मात्र, अधिकारीच उपस्थित नसल्याने कार्यकर्त्यांनी शिक्षण उपसंचालकांच्या दालनाच्या दारावरच निवेदन चिटकवत निषेध नोंदवला.

शिक्षणाचा अधिकार अर्थात आरटीईच्या अंतर्गत शासनाच्यामार्फत गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घेतले जात आहेत. अर्ज दाखल करण्याची 15 मार्च अंतिम मुदत आहे. मात्र, या ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेत तसेच, ऑनलाईन सर्व्हरमध्ये अनेक त्रुटी असून सर्व्हर संथगतीने सुरू आहे. याशिवाय त्यामध्ये अनेक अडचणीदेखील येत आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश पठाण व त्यांचे सहकारी शिक्षक उपसंचालक कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले. मात्र, निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यालयात जबाबदार अधिकारीच उपस्थित नसल्याने उपसंचालकांच्या दारावर निवेदन चिटकवून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी रमीज पठाण, संकेत गायकवाड, अमोल पाटील, आकाश बिरादर, धनंजय भालेराव आदी उपस्थित होते.

संथगतीमुळे पालक त्रस्त

प्रवेश अर्ज करण्याच्या प्रक्रियेत पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदरची वेबसाईट ही खूपच संथगतीने सुरू असून केवळ रजिस्ट्रेशनसाठी अर्धा ते एक तास व अर्ज भरण्यासाठी किमान एक ते दोन तास लागतात. सायबर कॅफेचालक फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट संथ असल्याकारणाने तीनशे ते चारशे रुपये घेतात. त्यामुळे पालकांना आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास होत आहे. याबाबतीत लक्ष घालून यंत्रणा पूर्ववत करण्याची मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

First Published on: March 9, 2023 1:18 PM
Exit mobile version