शासकीय जागेवर बांधा झोपड्या, राहुल नार्वेकरांच्या नावे अफवा, 40 गजाआड

शासकीय जागेवर बांधा झोपड्या, राहुल नार्वेकरांच्या नावे अफवा, 40 गजाआड

मुंबई : नरिमन पॉइंट येथील एका शासकीय मोकळ्या जागेवर झोपड्या बांधण्याची परवानगी दिल्याची अफवा काल, बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुला नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या नावे पसरली. त्यामुळे शेकडो लोक बांबू, दोरखंड, ताडपत्र्या घेऊन तिथे पोहोचले. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

नरिमन पॉइंट येथील मनोरा आमदार निवास (Manora MLA Hostel) ही इमारत पाडण्यात आली असून तिथे नवीन आमदार निवास बांधण्यात येणार आहे. मात्र, या जागी गरीबांना झोपड्या बांधण्याची परवानगी नव्या शिंदे सरकारने दिली असल्याची अफवा बुधवारी पसरली. त्यामुळे कफ परेड येथील लोकांनी तिथे गर्दी केली. अनेक जण बांबू, दोर घेऊन या भूखंडावर पोहोचले. अनेकांनी झोपड्या उभारण्यासाठी बांबू देखील बांधले होते. या संपूर्ण प्रकारामुळं त्या परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा – विरोधकांची सरकारे अस्थिर करण्यात केंद्र सरकार मग्न; शिवसेनेची टीका

दस्तुरखुद्द राहुल नार्वेकर यांना आपल्या नावाने अफवा पसरल्याचे समजताच त्यांनी लगेचच पोलिसांना त्याची माहिती दिली. त्यानुसार पोलीस तिथे दाखल होताच, त्या भूखंडावर जमलेल्या लोकांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी हा भूखंड मोकळा केला असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून 40 जणांना ताब्यात घेतले आहे. तथापि, ही अफवा कोणी पसरवली हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाहीये.

शिंदे सरकार सत्तेवर येताच अफवांचे पेव
विधानसभेत सोमवारी शिंदे सरकारवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर दोन दिवसांत अफवांचे पेव फुटल्याचे चित्र आहे. मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याची अफवा पसरली होती. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच याबाबतचा खुलासा केला होता. तर, आता बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाने अफवा पसरली होती.

First Published on: July 7, 2022 9:22 AM
Exit mobile version