जुनी खाट अधूनमधून कुरकुरते; सामनातून काँग्रेसला चिमटा

जुनी खाट अधूनमधून कुरकुरते; सामनातून काँग्रेसला चिमटा

प्रशासनातील अधिकाऱ्यांवरुन काँग्रेसमध्ये नाराजी आहे. यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू असं बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. यावर आता ‘सामना’तून काँग्रेसला चिमटा काढण्यात आला आहे. जुनी खाट अधूनमधून कुरकुरते अशा शब्दांत सामनातून काँग्रेसच्या नाराजी नाट्यावर निशाणा साधला आहे. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करू नये, असा अप्रत्यक्ष इशारा देखील भाजपला दिला आहे.

“काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा त्यांना अनुभव आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते आणि सत्ता कोणाला नको, असे नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रीपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये” अशा शब्दात काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर भाष्य करण्यात आलं आहे, तर भाजपला अप्रत्यक्षपणे इशारा देण्यात आला आहे.

सरकार तीन भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन बनलं आहे. त्या सरकारचे सुकाणू एकमताने उद्धव ठाकरे यांच्या हाती देण्यात आले. राज्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचाच निर्णय अंतिम राहील हे एकदा ठरल्यावर कोणताही प्रश्न उद्भवत नाही. स्वत: शरद पवार यांनी हे पथ्य पाळलं आहे. शरद पवार मुख्यमंत्र्यांना अधूनमधून भेटत असतात. त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यानुसार राज्यासंदर्भात ते काही सूचना करतात. काँग्रेस पक्षाचेही बरे सुरू आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.


हेही वाचा – जम्मू-काश्मीरः शोपियांमध्ये चकमक; ३ दहशतवाद्यांना कंठस्नान


दरम्यान, आघाडीच्या सरकारात अधूनमधून असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठेवली पाहिजे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे कुरकुरणेही तसे संयमी असते. घरात भावाभावांची भांडणे होतात. इथे तर तीन पक्षांचे सरकार आहे. थोडेफार कुरकुरणे होणारच, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देण्यात आला आहे.

 

First Published on: June 16, 2020 9:08 AM
Exit mobile version