उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन सचिन अहिर राहुल कलाटेंच्या भेटीला

उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन सचिन अहिर राहुल कलाटेंच्या भेटीला

यामुळे आता राहुल कलाटे हे उद्धव ठाकरेंचे ऐकून चिंचवड पोटनिवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार का, हे पाहावे लागेल. राहुल कलाटे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यास महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सरळ सामना होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी सगळेच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. यात पक्षातील काही इच्छुक उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्यानं नाराजी नाट्य सुरू झालं ते आजपर्यंत सुरूच आहे. यापैकी कसब्यात काँग्रेस आणि भाजपला आपापल्या पक्षातील नाराज नेत्यांची समजूत काढण्यात यश आले आहे. परंतु, चिंचवडमध्ये एकीकडे महाविकास आघाडीतर्फे नाना काटे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मात्र शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनंती करुनही राहुल कलाटे हे माघार घ्यायला तयार नाहीत. अखेर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी राहुल कलाटेंची भेट घेतली.

यावेळी राहुल कलाटेंच्या मनधरणीसाठी त्यांची भेट घेऊन यावर सविस्तर चर्चा केली. पोटनिवडणुकीतील उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जाणारे राहुल कलाटे नाराज झाले होते. गेल्या निवडणुकीत चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांच्या मतांची टक्केवारी लक्षणीय होती. त्यामुळे आताच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला याचा फटका बसू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचं टेन्शन दूर करण्यासाठी आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे सरसावले आहेत. उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन सचिन अहिर आज राहुल कलाटेंना भेटले. यावेळी राहुल कलाटे यांनी उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा देखील केली.

राहुल कलाटे यांचं वय पाहता त्यांचं राजकीय भविष्य चांगलं आहे, त्यांना अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. शेवटी अपक्ष लढण्याला काही मर्यादा असतात. गेल्यावेळी त्यांना चांगली मतं पडली होती. पण त्यावेळी कलाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारिपचा पाठिंबा होता, ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. चिंचवडमध्ये तिरंगी लढत झाल्यास त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो, त्यामुळे राहुल कलाटे यांनी योग्य विचार करून निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी व्यक्त केली.

यामुळे आता राहुल कलाटे हे उद्धव ठाकरेंचे ऐकून चिंचवड पोटनिवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार का, हे पाहावे लागेल. राहुल कलाटे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यास महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सरळ सामना होणार आहे.

First Published on: February 10, 2023 12:52 PM
Exit mobile version