पाथरी नंतर बीड जिल्ह्याचाही साईबाबांवर दावा; म्हणे, १०० कोटी आम्हाला पण

पाथरी नंतर बीड जिल्ह्याचाही साईबाबांवर दावा; म्हणे, १०० कोटी आम्हाला पण

श्री साईबाबा यांचे जुने छायाचित्र

सबका मालिक एक है, अशी शिकवण देणाऱ्या श्री साईबाबा यांच्या जन्मस्थळाचा वाद नवा असतानाच आता नवीन एक वाद समोर आला आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील ग्रामस्थ साईबाबांचा जन्म आमच्याकडे झाल्याचे सांगत आहेत. त्यानंतर आता बीड जिल्ह्यातील ग्रामस्थांनीही साईबाबा बीडमध्ये काही काळ वास्तव्यास असल्याचा दावा केला आहे. फक्त वास्तव्यच नाहीतर साईबाबांनी बीडमध्ये नोकरी केली असल्याचे काही साईभक्तांचे म्हणणे आहे. बीड जिल्हा साईबाबांची कर्मभूमी असल्यामुळे तीर्थक्षेत्र विकासासाठी शंभर कोटींचा निधी जिल्ह्याला द्यावा, अशी मागणी देखील आता बीडकरांनी केली आहे.

पाथरीहून शिर्डीला जात असताना साईबाबा काही वर्ष बीडमध्ये राहिले होते, असा उल्लेख साईचरित्रात आहे. बीडमधील साईभक्त पाटणकर यांनी हा दावा केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, आमचे वडील जनार्दन महाराज पाटणकर यांनी आम्हाला याबाबत माहिती दिली होती. साईबाबांनी बीडमध्ये चार ते पाच वर्ष एका हातमागाच्या दुकानात काम केले होते.

तर आणखी किर्तनकार भरतभाऊ रामदासी म्हणाले आहेत की, साईबाबांचा जन्म परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे झाला. त्यानंतर ते बीडमध्ये आले. साईबाबा हे फकीर होते, ते एकाजागी कधी थांबत नव्हते. तसा उल्लेखच दासगणू महाराजांच्या ग्रंथात आहे. केशवराज बाबासाहेब महाराज हे साईबाबांचे गुरु असून त्यांची भेट परभणीच्या सेलू येथे झाली होती. तेथेच साईबाबांनी महाराजांकडून अध्यात्मिक शिक्षण घेतले आणि त्यानंतर ते शिर्डीला गेले.

बीड जिल्हा हा श्री साईबाबांची कर्मभूमी राहिलेली आहे. ज्याप्रमाणे पाथरीला तीर्थक्षेत्र विकासासाठी १०० कोटींचा निधी मिळत आहे. त्याप्रमाणे आता बीड जिल्ह्यात तीर्थक्षेत्र विकासासाठी १०० कोटी देण्यात यावेत, अशी मागणी जिल्ह्यातील साईभक्त करत आहेत. परभणी आणि बीड हे दोन्ही जिल्हे मराठवाड्यातील असून विकासापासून वंचित आहेत. शिर्डीमध्ये ज्याप्रमाणे विकास झालाय तसा आपल्याइथेही व्हावा, अशी स्पर्धाच आता या दाव्यातून दिसून येत आहे.

First Published on: January 21, 2020 1:10 PM
Exit mobile version