रायगडमध्ये साखरचौथ गणेशोत्सवाचे वेध !

रायगडमध्ये साखरचौथ गणेशोत्सवाचे वेध !

गणपतींचं विसर्जन झाले की चाहुल लागते ती भाद्रपदातल्याच संकष्टीची म्हणजेच साखरचौथीची. पुन्हा नव्याने तेच वातावरण अनुभवण्याची. साखरचौथीच्या गणपतीची प्रथा वर्षानुवर्षे, परंपरांगत चालत आली आहे. या प्रथेकरता काही लिखित आधार मिळत नाही किंवा कोणती पौराणिक कथा आढळून येत नाही. पितृपक्ष जरी असला तरी गणेश हा गणनायक असल्याने स्थापनेसाठी पितृपक्षाचा विचार केला जात नाही.

ही प्रथा कोकणातच प्रचलित आहे. कोकणात गणपती मुख्य कुटुंबात एकच बसवला जातो. कुटुंबातील मूळ गणपतीची सेवा मुख्य कुटुंबाला करावी लागते. अशा कुटुंबातील भक्त श्रद्धेने गणेशाकडे काही नवस करतात आणि त्याची पूर्तता झाली की भाद्रपदातल्या संकष्टी चतुर्थी म्हणजेच साखरचौथीला गणपतीबाप्पाची स्थापना करतात. नवसाचे हे गणपती तीन वर्षे आणेन, पाच वर्षे आणेन असे नवस बोलले जातात. पण ज्यांना यांचा सहवास कायम हवा असतो ते कायम म्हणजे दर साखरचौथीला गणपतीबाप्पाची स्थापना करतात. यातही दीड दिवस, पाच दिवस, 21 दिवस असे गणपती आणले जातात.
ह्या स्थापनेमागचा दुसरा उद्देश म्हणजे हल्ली विभक्त कुटुंब पद्धती वाढत चालली आहे. त्यामुळे काही हौशी भक्त मूळ कुटुंबात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती असल्यामुळे आपल्याही घरात गणपती यावा, आपल्या घरातील वातावरण पवित्र व्हावे या उद्देशाने साखरचौथीच्या दिवशी आपल्या घरात गणपतीची स्थापना करतात.

अजून एक प्रथा म्हणजे गणेश चतुर्थीच्या काळात जर घरात काही सुयेर किंवा सुतक आले तर ते संपल्यावर त्यावर्षी साखरचौथीच्या दिवशी ते गणेशभक्त गणपतीची स्थापना करतात. हल्ली तर सणांची हौस म्हणून साखरचौथीचा सार्वजनीक गणपतीही आणला जातो. हा देखील 5 दिवस, 10 दिवस अथवा 21 दिवसांचा ठेवला जातो.

साखरचौथीच्या गणपतीच्या स्थापनेचा विधी गणेश चतुर्थीच्या विधी सारखाच केला जातो. फक्त गणपती बापाचे आवडते मोदक हे साखरेच्या पुरणाचे केले जातात. उंदीरमामाच्या मोदकांची कावड साखर भरुन केली जाते.साखरचौथीचे व्रतासाठी महत्व असते. जे भक्त 11 संकष्टी, 21 संकष्टीचे व्रत करतात त्यांच्या व्रताची सांगता साखरचौथीच्या दिवशी केली जाते. मग ह्या दिवशी साखरेच्या मोदकांमध्ये एक मोदक मिठाचा खडा ठेवून केला जातो. उपास करणार्याने त्या दिवशी हे मोदक खाऊन उपास सोडायचा असतो. एक एक मोदक खाताना, मीठाचा खडा असलेला मोदक आला की जेवण बंद करायचे. पहिलाच मोदक मीठाचा आला तर मग तेवढाच खायचा.

First Published on: September 17, 2019 1:10 AM
Exit mobile version