संभाजी महाराज दारूच्या नशेत; ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ पुस्तकात उल्लेख

संभाजी महाराज दारूच्या नशेत; ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ पुस्तकात उल्लेख

संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी‘ या पुस्तकात केला आहे. या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांचा दारुड्या असा उल्लेख करण्‍यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. डॉ. शुभा साठे लिखित ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात हा आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाचे सर्व शिक्षा अभियानाचे हे पुस्तक वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे.

हेच ते ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ पुस्तक

समर्थ श्री रामदास स्वामी’ हे पुस्तक डॉ. शुभा साठे यांनी लिहिले असून त्याचे प्रकाशन नागपूरमधील लाखे प्रकाशनाने केले आहे. सर्व शिक्षा अभियानात समाविष्ट असणाऱ्या या पुस्तकातील पान क्रमांक १८ वर संभाजी महाराजांविषयी उल्लेख आहे. ‘रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात आणि कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले’, असा उल्लेख या पुस्तकात आहे.

संभाजी ब्रिगेडचा तीव्र आक्षेप

संभाजी महाराज दारुच्या कैफात होते, या वाक्यावर संभाजी ब्रिगेडने तीव्र आक्षेप घेतला आहे. इतिहासात असा कोणताही पुरावा नसताना कोणत्या आधारावर हा उल्लेख केला. तसेच सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात कुठलाही पुरावा नसताना छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. असा संभाजी महाराजांविषयी दिशाभूल करणारा आणि बदनामी करणारा मजकूर शालेय प्राथमिक पुस्तकात छापला जातो. हे राज्य सरकारचे दुर्दैव आहे, असेही ब्रिगेडने म्हटले आहे. हा निव्वळ करंटेपणा असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

First Published on: October 11, 2018 10:07 PM
Exit mobile version