संभाजी राजेंचे पन्हाळा किल्ल्याच्या डागडुजी आणि संवर्धनासाठी राज्य सरकारला पत्र, म्हणाले…

संभाजी राजेंचे पन्हाळा किल्ल्याच्या डागडुजी आणि संवर्धनासाठी राज्य सरकारला पत्र, म्हणाले…

किल्ले पन्हाळगडावर झालेल्या मुसळधार पावसामुळे किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज ढासळले आहेत. किल्ल्याला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. या सदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पुरातत्व विभाग यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात या विषयाकडे लक्ष देण्याची विनंती संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

या पत्रात महाराष्ट्रातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक असलेल्या आणि करवीर छत्रपतींची राजधानी म्हणून ओळखला जाणारा किल्ले पन्हाळगड अखेरची घटका मोजत आहे. पावसामुळे किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज ढासळले असून अनेक ठिकाणी भेगाही पडत आहेत, अशा शब्दात त्यांनी खंत व्यक्त केले आहे.

जिवितहानी झाल्यास जबाबदार कोण? –

कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या काही वर्षांपासून महापुराचा सामना करावा लागतोय, या संततधार पावसामुळे पन्हाळा किल्ल्याचे अस्तित्व सुद्धा धोक्यात आले असून किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले ग्रामस्थ ही इथे दिवस रात्र भीतीच्या छायेत जगत आहेत. बुरुज आणि तटबंदी कोसळल्यामुळे पायथ्याशी असलेल्या गावात मोठमोठे दगड आणि पाण्याचे लोट येत आहेत. दुर्दैवाने काही जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण, प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे असे चित्र दिसते, अशा वेदना मांडताना प्रशासनावर कानाडोळा केल्याचा आरोप संभाजी राजे यांनी केला आहे.

शिवप्रेमींची नाराजी –

अश्यातच पन्हाळ्याला केंद्रीय पुरात्तव खात्याचा पूर्ण वेळ प्रभारी अधिकारी नसल्याने राज्य शासनाची ही जबाबदारी ठरते. वेळीच किल्ल्याची डागडुजी व संवर्धन केले नाही तर हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती ताराराणी यांच्या पराक्रमाचा वारसा लाभलेला ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पन्हाळगडाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासन व नगरपालिके बाबत शिवप्रेमी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. आपण यामध्ये तातडीने लक्ष घालून प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश द्यावेत, अशा शब्दात राज्य सरकारला  त्यांनी जबाबदारीची आठवण  करून दिली आहे.

First Published on: July 12, 2022 8:55 PM
Exit mobile version