पंतप्रधानांकडून उद्योग परत घेऊन दाखवा; संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारला आवाहन

पंतप्रधानांकडून उद्योग परत घेऊन दाखवा; संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारला आवाहन

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत. त्यांच्याकडून महाराष्ट्रातून बाहेर गेलेले दोन, अडीच कोटींचे उद्योग परत घेऊन दाखवा, असे आवाहन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी शिंदे-फडणवीस सरकारला केले.

गुरुवारी पंतप्रधान मोदी मुंबईत येत आहेत. त्यांना व्यासपीठावरून विनंती करा आणि महाराष्ट्राबाहेर गेलेले कोट्यवधी रुपयांचे उद्योग परत मिळवून दाखवा, असे खासदार राऊत यांनी सांगितले. दावोसमध्ये सव्वा लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाले, असे मंगळवारी शिंदे-फडणवीस सरकारने सांगितले. बुधवारी मात्र हा आकडा ८८ हजारांवर आला, या प्रश्नावर उत्तर देताना खासदार राऊत म्हणाले, हीच तर खरी गंमत आहे. दावोसमध्ये काय चालत आम्हाला माहिती आहे. गुंतवणुकीसाठी परिषदा घेतल्या जातात. प्रत्यक्षात किती उद्योगांची वीट रचली जाते हे कळेलच. त्यावेळी आम्ही बोलूच.

मोदींकडून आमच्याच कामांचे उद्घाटन

आम्ही व पालिकेने केलेल्या कामांचे उद्घाटन करण्यासाठी गुरुवारी पंतप्रधान मोदी मुंबईत येत आहेत. या सर्व कामांची पायाभरणी आम्हीच केली आहे, असे खासदार राऊत यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी विद्यापीठाची सुरक्षा भिंत तोडली जात आहे यावर खासदार राऊत म्हणाले, गेल्या वेळी कार्यक्रम घेतला तेव्हा विद्यापीठात घाण करून ठेवली. सुरक्षेचे कारण असेल तर पंतप्रधानांची व्यवस्था दुसरीकडे करता आली असती. त्यामुळे युवा सेनेने केलेल्या प्रश्नाचे उत्तर सरकारला द्यावे लागणार आहे.

डॉक्टरांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता

डॉक्टरांचा अपमान करण्याचा कोणताच हेतू नव्हता. डॉक्टर हे सफेद कपड्यातील देवदूतच आहेत. त्यांचा अपमान केला जाऊ शकत नाही. कोरोनाकाळता डॉक्टरांची कमतरता होती. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केले, असा मी बोललो असल्याचा खुलासा खासदार राऊत यांनी केला.

सन्माने बोलवत नाही

आम्ही सावरकरांचे तैलचित्र लावले तेव्हा सावरकरांच्या कुटुंबियांना सन्मानाने बोलावले होते. बाळासाहेबांचे तैलचित्र लावताना ठाकरे कुटुंबियांना सन्मानाने बोलावणे अपेक्षित होते. तसे शिंदे-फडणवीस सरकार करत नाही. देवेंद्र फडणवीस हे सुडाचे राजकारण करत आहेत की नाही हे माहित नाही. पण राज्यात सध्या सुडाचे राजकारण सुरु आहे. उद्धव ठाकरे म्हणाले होते की बाप चोरणारी टोळी आली आहे हे खरचं आहे, याची आठवण खासदार राऊत यांनी करून दिली. मुस्लिम द्वेष नको या पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यावर खासदार राऊत म्हणाले, दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य कोणीच करु नये. कोणताही चित्रपट अथवा समाजाविषयी बोलताना भान ठेवायलाच हवे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी केलेले वक्तव्य योग्यच आहे.

 

First Published on: January 18, 2023 11:52 AM
Exit mobile version