“मतदारांना त्यांचा निर्णय घेऊ द्या…” पोटनिवडणुकीबाबत संजय राऊतांनी केले स्पष्ट

“मतदारांना त्यांचा निर्णय घेऊ द्या…” पोटनिवडणुकीबाबत संजय राऊतांनी केले स्पष्ट

राज्यात पार पडलेल्या शिक्षण आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकींमध्ये मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे भविष्यात देखील मतदारांकडून महाविकास आघाडीलाच बहुमत मिळेल, असे मत महाविकास आघाडीकडून व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत होणार्‍या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय मविआकडून घेण्यात आला आहे. पण ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशा आशयाचे पत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांना लिहिले आहे. यासोबतच त्यांनी इतर पक्षाच्या नेत्यांना सुद्धा याबाबत आवाहन केले आहे. “मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी,” असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केले आहे.

राज ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना लिहिलेले पत्र आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येणारे प्रयत्न यावरून आता ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट मत मांडले आहे. संजय राऊत म्हणाले की, ”मुख्यमंत्र्यांकडून ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी करण्यात येणारे प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत. आम्ही चिंचवड – कसबा पेठ पोटनिवडणुकीबाबत सर्व्हे केला असून दोन्ही मतदारसंघातील लोकांना निवडणूक हवी आहे. मतदारांना त्यांचा निर्णय घ्यायचा आहे. शिक्षक, पदवीधरांनी जो निर्णय दिला, तसाच चिंचवड-कसबा पेठमध्येही लागेल. राज ठाकरेंनी नेहमीप्रमाणे पत्र लिहिले असले तरी निवडणूक होईल.”

हेही वाचा – कसबा, चिंचवड जागा सुद्धा मविआ एकत्रित लढणार; आमचा राजकीय शत्रू एकचं; संजय राऊतांचं विधान

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राज्य सरकारकडून महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती याबद्दल वारंवार उल्लेख करण्यात येत आहे. याबाबत देखल संजय राऊत यांनी सरकारला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खडेबोल सुनावले आहेत. ”महाराष्ट्रात सर्वात आधी घाणेरड्या राजकारणाची सुरुवात कुणी केली? राजकारण गढूळ कुणी केले? सूडाचे राजकारण कुणी सुरू केले? यावरही चिंतन व्हायला हवे. देवेंद्र फडणवीस मागे म्हणाले होते की, राजकारणातील कटूता कमी करण्यासाठी ते प्रयत्न करतील. पण त्यांचे एकही पाऊल याबाबत पडलेले दिसत नाही. याबाबत राज्यातील जनतेला संभ्रम आहे. कसबा-चिंचवडसाठी भाजपाने उमेदवार जाहीर केले आहेत. कसब्याची जागा काँग्रेस लढविणार होती, त्याप्रमाणे त्यांनी उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना चिंचवडच्या जागेबाबत आग्रही आहे. त्याबाबत मविआ लवकरच निर्णय घेईल.” असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

First Published on: February 5, 2023 12:08 PM
Exit mobile version