अनिल देशमुखांबाबतच्या ‘त्या’ वृत्ताला संजय राऊतांनी दिला दुजोरा, म्हणाले…

अनिल देशमुखांबाबतच्या ‘त्या’ वृत्ताला संजय राऊतांनी दिला दुजोरा, म्हणाले…

100 कोटी रुपये वसुली प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख हे 11 महिने तुरुंगात होते. याच प्रकरणी निलंबित अधिकारी परमबीर सिंह यांचे देखील शिंदे-फडणवीस सरकारने निलंबन मागे घेतल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पण या प्रकरणात अनिल देशमुख यांना फसवण्याचा प्रयत्न झाल्याचे वारंवार बोलण्यात येत आहे. असे असतानाच आता पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्या संदर्भातील एका गोष्टीला दुजोरा दिल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – मंत्रिमंडळ विस्ताराआधीच बच्चू कडू झाले ‘मंत्री’; नेमकं प्रकरण काय?

अनिल देशमुख यांच्यावर भाजपमध्ये जाण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. ते जर का त्यावेळी भाजपमध्ये गेले असते तर सरकार पडले असते, असे अनिल देशमुख यांच्याकडून सांगण्यात आले आहे. याबाबत पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारले असता, ते म्हणाले की, अनिल देशमुख खरं बोलत आहेत. त्यांना कोणत्या प्रकारचा दबाव आणि ऑफर होती, त्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत. काही व्हिडीओ क्लिप्स त्यांच्याकडे आहेत. कोण त्यांना भेटलं? कोणी त्यांना ऑफर्स दिल्या? कोण त्यांच्याशी काय बोललं? कोण त्यांच्या सह्या अॅफिडेव्हिटवर घेऊ इच्छित होतं? कुणाची नावं घ्या असा दबाव होता? ही सर्व माहिती माझ्याकडे होती आजही आहे. देशमुखांशी अनेकदा माझं बोलणं झालं होतं. आजही त्यांच्याकडे पुरावे आहेत. काही पुरावे त्यांनी शरद पवार यांनाही दाखवले होते. त्यांनी सर्व प्रस्ताव नाकारल्यावर त्यांच्यावर खोटे आरोप करून तुरुंगात टाकण्यात आलं, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांच्याकडूनही करण्यात आलेला आहे.

आम्ही 19 खासदार निवडून आणू…
शिंदे गटाकडे त्यांचे लोकसभेसाठी 13 उमेदवार तरी आहेत का? त्यांच्या त्या 13 पैकी एकही खासदार निवडून येणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ते शिवसेनेकडून निवडून आले होते. त्यामुळे 19 चे 19 खासदार आमच्याकडे आहेत. त्या सर्व जागांवर परत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील, लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचं मेरिटवर सिलेक्शन होणार आहे. त्यात दूमत नाही. आमचे लोकसभेत 19 खासदार होते. आम्ही 19 खासदार निवडून आणू. आमचे 19 खासदार लोकसभेत असतील, असा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेला आहे.

केंद्र सरकारच्या अध्यादेशाचा एकजुटीने विरोध करू…
आज 12.30 वाजता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटायला येणार आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करू. दिल्ली सरकारच्या विरोधात जो अध्यादेश केंद्र सरकारने काढला आहे, त्याविरोधात आम्ही राज्यसभेत एकजुटीने विरोध करू. त्याविरोधात आम्ही वातावरण तयार करत आहोत. आम्ही केजरीवालांसोबत आहोत, असेही संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

First Published on: May 24, 2023 11:47 AM
Exit mobile version