संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर घणाघाती आरोप; म्हणाले, फक्त शिवेसना, राष्ट्रवादी…

संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर घणाघाती आरोप; म्हणाले, फक्त शिवेसना, राष्ट्रवादी…

Sanjay Raut on Kirit Somaiya | मुंबई – “भीमा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचारप्रकरणी शेतकरी प्रतिनिधी आणि काही सामाजिक कार्यकर्ते भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याकडे गेले होते. मात्र, मी फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रकरणे घेतो. त्यांचं काही असेल तर सांगा, असं सोमय्या यांनी शेतकरी प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितलं,” असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. आज त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्याआधी त्यांनी भीमा सहकारी साखर कारखान्यातील ५०० कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते.

हेही वाचा संजय राऊतांचा मास्टरस्ट्रोक, ‘या’ साखर कारखान्यातील घोटाळा तपशीलासहित केला सादर

संजय राऊत म्हणाले की, “१७ कारखान्यांतील भ्रष्टाचाराची प्रकरणे माझ्याकडे आहेत. त्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचार मी उघड केला आहे. भाजपाकडून केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने साखर कारखानदार आणि लहान उद्योजकांना त्रास दिला जातो. एकाच पक्षाच्या नेत्यांवर तपास यंत्रणा लावली जाते. मग आपल्यासोबत, आपल्या पक्षातील भ्रष्टाचारावर आवाज कोण उठवणार?” असा सवाल संजय राऊतांनी भाजपाला विचारला.

भीमाचं प्रकरण किरीट सोमय्या यांच्याकडे चारवेळा पाठवलं. सामाजिक कार्यकर्ते, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी याप्रकरणी किरीट सोमय्या यांची भेट घेतली. शिवसेना आणि राष्ट्रवादीची प्रकरणं असतील तर घेऊन या. बाकी कोणत्याही प्रकरणाला हात लावणार नाही. काहीही असलं तरीही हे प्रकरण घेणार नाही, असं सोमय्यांनी सांगितल्याची संजय राऊत म्हणाले.

“राहुल कुल यांच्यासोबत माझी व्यक्तिशः कोणतीही दुश्मनी नाही. ते कोणत्या समितीचे अध्यक्ष आहेत हेही मला माहीत नाही. मी कोणत्याही नोटीशीला घाबरत नाही,” असंही संजय राऊत म्हणाले. भीमा साखर कारखान्यात जवळपास ५०० कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. याप्रकरणी दोन हजार पानांचं पुरावे मी देवेंद्र फडणवीसांना पाठवणार आहे. हे प्रकरण ५०० कोटींचं मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण आहे. हे ५०० कोटी कुठे गेले, परदेशात गेले ते शेअर कंपन्यामार्फत आले आणि गेले का? याचा तपास किरीट सोमय्यासारख्या तपास यंत्रणांनी केला पाहिजे. या देशात फक्त विरोधी पक्षातील लोकच भ्रष्टाचार करत आहेत का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

First Published on: March 13, 2023 10:31 AM
Exit mobile version