राऊतांचे संसदेतील गटनेतेपद जाणार; गजानन कीर्तिकर यांच्या नावाचा प्रस्ताव

राऊतांचे संसदेतील गटनेतेपद जाणार; गजानन कीर्तिकर यांच्या नावाचा प्रस्ताव

नवी दिल्लीः संसदीय कार्यमंत्र्यांना संसदेचा गटनेता म्हणून शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती करण्याचे पत्र देण्यात आल्याची माहिती शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळे सध्या राज्यसभेचे गटनेते असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे गटनेतेपदही जाणार आहे.

राहुल शेवाळे म्हणाले की, निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहे. त्यानुसार आता शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आहेत. राज्यसभेचे गटनेते संजय राऊत आहेत, मात्र यापुढे संसदेचा गटनेता ठरविण्याचा अधिकार शिंदे यांनाच आहे. त्यानुसार संसदीय कार्यमंत्र्यांना संसदेचा गटनेता म्हणून गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती करण्याचे पत्र देण्यात आले आहे.

राज्यसभेत तीन खासदार आहेत. त्यात संजय राऊत यांचाही समावेश आहे. त्यांनाही शिवसेनेचा व्हीप मान्य करणे अनिवार्य असल्याचे शेवाळे यांनी नमूद केले, मात्र आता लगेच संसदेच्या अधिवेशनात व्हीप देण्यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचेही शेवाळे यांनी सांगितले.

प्रतोदपदासाठी बाजोरियांच्या नावाचा प्रस्ताव
दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विप्लव बाजोरिया यांना विधान परिषदेत शिवसेनेचा प्रतोद बनवण्याचा प्रस्ताव उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांना सादर केला आहे, तर ठाकरे गटाने विलास पोतनीस यांच्या नियुक्तीची मागणी केली आहे. विधान परिषदेतील 12 सदस्य, तर राज्यसभेतील 3 सदस्य हे उद्धव ठाकरे यांचेच पाठीराखे आहेत.

 

First Published on: March 1, 2023 5:15 AM
Exit mobile version