फडणवीसांकडून खंडणीखोर अधिकाऱ्यांची वकिली, संजय राऊतांचा पलटवार

फडणवीसांकडून खंडणीखोर अधिकाऱ्यांची वकिली, संजय राऊतांचा पलटवार

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस खंडणीखोर अधिकाऱ्यांची वकिली करत आहेत. फडणवीसांसारख्या नेत्याचे अधःपतन बघवत नाही असा पलटवार शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी एनसीबीच्या कारवाईवर महाविकास आघाडीतील नेत्यांचे आरोप गंभीर असून याची चौकशी झाली पाहिजे असे मत व्यक्त केलं आहे. फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर केलेल्या टीकेलाही राऊतांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आमची दलाली काढत असाल तर आम्ही तुमची काढू का? असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर पलटवार केला आहे. संजय राऊत यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान फडणवीसांना थेट इशारा दिला आहे. राऊत म्हणाले की, ज्या अधिकाऱ्यांसाठी वकिली करत आहेत. त्या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षांपासून अनेक प्रकरणे केली आहेत. एनसीबीने रिया चक्रवर्ती प्रकरणात गाजा वाजा केला परंतु त्या प्रकरणात अजून आरोपपत्र गेले नाही. एकूण २७ प्रकरणे आहेत. ही खंडणीखोरी आहे हे स्पष्ट झाले आहे. अशा खंडणीखोरांसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वकिली करत आहेत. फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचे हे अधःपतन मला बघवत नाही असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

तुमची दलाली काढू का?

राज्यातील दलालीवर नेते गप्प का? असा सवाल फडणवीसांनी केला होता. यावर राऊतांनी पलटवार केला आहे. विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस काय बोलतात यावर परसेप्शन ठरत नाही. कोण काही बोलत नाही, हा गप्प, तो गप्प ही दलाली, ती दलाली आमच्या दलालीवर बोलतात तर तुमच्या दलालीवर आम्ही तोंड उघडले तर? राज्यातील ५ वर्षांचा, दिल्लीतील नेत्यांच्या ७ वर्षांच्या आणि गुजरातमधील २० वर्षांची दलाली काढली तर दलाली म्हणजे काय याचा खरा अर्थ लोकांना देशाला कळेल. त्यामुळे काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारु नये असे संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा केंद्राचा कट

केंद्र सरकारचा फार मोठा कट आणि डाव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः सांगितले आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सुरु आहे. मुंबई पोलीस, सिनेसृष्टी, राज्य सरकार, महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र मंत्रिमंडळ असेल त्यांचे राज्य आले नाही. त्यांचा मुख्यमंत्री झाला नाही त्यामुळे त्याचा राग हे अशाप्रकारे काढत आहेत. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे कधीही झुकणार नाही. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर कितीही करा आम्ही आमचे काम करत राहू असे संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा : वानखेडेंवर आरोप केल्यावर भाजपला त्रास, वसुलीच्या भागीदारीत सहभाग आहे का?; नवाब मलिकांचा सवाल


 

First Published on: October 27, 2021 2:43 PM
Exit mobile version