भाजप नेत्यांना स्वप्नदोष झालाय – संजय राऊत

भाजप नेत्यांना स्वप्नदोष झालाय – संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत

एकीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर बोचरी टीका केली असतानाच त्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तितक्याच टोचणाऱ्या शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे. ‘हे सरकार ८ महिन्यांत पडेल आणि त्यानंतर पुन्हा भाजपचंच सरकार येईल’, या विरोधकांच्या दाव्याला संजय राऊत यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. ‘रात्री डोळे मिटले की सत्ता येते आणि सकाळी डोळे उघडले की सत्ता जाते. रात्री फक्त स्वप्नातली सत्ता येते. हा स्वप्नदोष आहे’, असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच, ‘नवं सरकार आल्यानंतर त्यांना काम करू देण्याऐवजी तुम्ही पहिल्याच दिवसापासून सभात्याग, आदळआपट करणार असाल, तर लोकं तुमच्या तोंडात शेण टाकतील’, असा सल्ला देखील संजय राऊत यांनी दिला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही टीका केली आहे.

‘या निराशांचं कौन्सेलिंग करायला हवं’

दरम्यान, भाजपकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांवर संजय राऊतांनी यावेळी खोचक टीका केली. ‘१०५ आमदार येऊनही सरकार न येणं हा भाजपसाठी मोठ्या भूकंपाचा धक्का आहे. त्यांना मनोविकार तज्ज्ञांकडून कौन्सेलिंग करण्याची गरज आहे. तसं असेल, तर राज्याच्या वैद्यकीय मंत्र्यांनी त्यासाठी आवश्यक त्या बाबी कराव्यात. मला जर संधी मिळाली, तर नक्कीच त्यांचं कौन्सेलिंग करेन. निराशेच्या गर्तेत सापडलेले, दीन दुबळे, गरीब, शोषित, सर्वस्व गमावल्याच्या भावनेतून जे अस्वस्थ असतात, त्यांची मानसिकता सकारात्मक करणं हे महाराष्ट्रातल्या प्रमुख लोकांनी करणं गरजेचं आहे’, असं राऊत म्हणाले.

‘सर्व खात्यांचा बाप आमच्याकडे’

दरम्यान, यावेळी ‘मलईदार खाती’ हा शब्द मला मान्य नाही’ असं राऊत म्हणाले. ‘मलई वाळवंटाशी निगडित खात्याशी देखील खाता येऊ शकते. सर्व खाती लोकांच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. शिवसेनेकडे सगळ्या खात्यांचा बाप म्हणजे मुख्यमंत्रीपद आहे. खात्यांशी निगडित अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. त्यामुळे आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही. काँग्रेस पक्षाकडे ४४ आमदार आहेत. पण तरीही त्यांना अनेक महत्त्वाची खाती मिळाली आहेत. राष्ट्रवादीकडे ५४ आमदार आहेत. त्यांच्याकडेही महत्त्वाची खाती आहेत. त्यामुळे खात्यांची वाटणी ताकदीनुसार समसमान झाली आहे’, असं ते म्हणाले.


हेही वाचा – हे सरकार ८ महिन्यांत खाली येईल-देवेंद्र फडणवीस
First Published on: January 5, 2020 4:52 PM
Exit mobile version