जिल्हा बँकेतील पराभवाला शिवेंद्रसिंहराजे १०० टक्के जबाबदार, शशिकांत शिदेंचा आरोप

जिल्हा बँकेतील पराभवाला शिवेंद्रसिंहराजे १०० टक्के जबाबदार, शशिकांत शिदेंचा आरोप

"तु्म्हाला हिशोब करायचा असल्यास कधीपण करु", शिवेंद्रसिंह राजेंचं शशिकांत शिंदेंना प्रत्युत्तर

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेंच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जावळी मतदारसंघातील हेव्हिवेट नेते शशिकांत शिंदे यांचा या मतदारसंघात पराभव झाला आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे ज्ञानदेव रांजणे विजयी झाले आहेत. अवघ्या एका मताने शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला आहे. यावर भूमिका मांडताना माझ्या पराभवाला शिवेंद्रसिंहराजे भोसलेच १०० टक्के जबाबदार असल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला आहे. तसेच विरोधात असलेले सहकार पॅनलमध्ये एकत्र कसे असा सवाल शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांना केला आहे. मला पाडण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला आहे. अवघ्या एका मताने शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. शिंदे यांचा पराभव करण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले असल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी साताऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक केली होती. या दगडफेकीनंतर शिंदेंनी माफी मागितली होती. तर आता शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. शशिकांत शिंदे म्हणाले की, मला पराभूत करण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले आहे. हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे एवढीच इच्छा असल्याचे शिंदे यांनी म्हटलं आहे.

शशिकांत शिंदेच्या पराभवाला शिवेंद्रराजे जबाबदार

निवडणुकीतील पराभवावर शशिकांत शिंदे यांनी भूमिका मांडताना आरोप केला की, जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये १०० टक्के राजकारण झाले. काही लोकांना पाडण्याच्या संदर्भात १०० टक्के निर्णय झाला. जिल्ह्यातील अनेक लोकांनी याला मदत केली आहे. तर काही लोकांनी अप्रत्यक्षपणे निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. शशिकांत शिंदेंच्या पराभवाला १०० टक्के शिवेंद्रसिंहराजे जबाबदार आहेत. यामागे फार मोठे षडयंत्र आहे. पक्षाच्या आदेशाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या निर्णयाच्या बाहेर जाऊन काहीही कऱणार नाही. परंतु सध्याची परिस्थिती पाहता हा विषय गांभीर्याने घ्यावा अशी इच्छा शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

विरोधात काम करणारे सहकार पॅनेलमध्ये कसे?

दरम्यान बिनविरोध उमेदवारांवरुन शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. एकाच दिवसात अर्ज निघाले आणि ते बिनविरोध कसे झाले? याचा खुलासा पॅनेलच्या प्रमुखांनी करावा अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली आहे. तसेच जे लोक विरोधात काम करतात ते सहकार पॅनेलमध्ये कसे आणि ते बिनविरोध कसे निवडून येतात असा प्रश्न शशिकांत शिंदे यांनी केला आहेत. पक्षाकडून जबाबदारी मिळाल्यास पक्ष वाढीसाठी सातारा जिल्हा निवडणुकीमध्ये प्रयत्न करेल तसेच सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालणार असल्याचेही शशिकांत शिंदे यांनी सांगितले आहे.


हेही वाचा : खोत, पडळकरांची एसटी कामगार संपातून माघार; कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची दिशा ठरवावी


 

First Published on: November 25, 2021 2:52 PM
Exit mobile version